कोल्हापूर : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले. मनमोहन सिंग यांच्याविषयी १की आठवण खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितली . ते म्हणाले २०14 ते 2019 या कालावधीमध्ये लोकसभेचा सदस्य म्हणून काम करत असताना 2018 साली डॉ. मनमोहन सिंग जी यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती.
यावेळी त्यांच्या संपर्क कार्यालयातून मला त्यांच्या घरी भेटण्याची वेळ देण्यात आली होती. एक जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ, भारताचे माजी पंतप्रधान, एक हुशार व अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांची ख्याती होती. अशा या थोर व्यक्तिमत्वास भेटण्याची पहिलीच वेळ असल्यामुळे मनात एक आदरयुक्त भीती होती. त्यामुळे त्यांच्यासमोर जाताना सुरुवातीस खूप दडपण आले होते. परंतु त्यांच्या घरी गेल्यावर त्यांनी माझी आपुलकीने चौकशी केली व कुतूहलाने माझ्या विषयी सर्व माहिती जाणून घेतली. मी कुठून आलो आहे? माझे गाव कोणते? मी राजकारणात कसा आलो? याबाबत विचारणा केली. हळूहळू आमचा संवाद खुलत गेला. मी माझ्या राजकीय जीवनाची व व्यवसायाबद्दलची माहिती त्यांना अगदी मनमोकळेपणे सांगितली.
माझ्याबद्दलची सर्व माहिती ऐकून घेतल्यानंतर त्यांनी मला अगदी मोलाचा सल्ला दिला. तुमच्यासारख्या तरुणांना राजकारणामध्ये व व्यवसायामध्ये चांगले भविष्य आहे. अधिक जोमाने काम करा, जनतेची सेवा करत रहा हा त्यांचा लाख मोलाचा सल्ला माझ्या सदैव स्मरणात राहील.
या भेटीदरम्यान थंडीचे दिवस होते. दिल्लीमध्ये जास्त प्रमाणात खाल्ला जाणार पदार्थ कजग हा त्यांच्या पत्नी मा. गुरुशरण कौर जी यांनी मला आपुलकीने खायला दिला. तो पदार्थ मला खूपच आवडला आहे, असे मी म्हटल्यानंतर मॅडमनी पुन्हा मला कजगचे दोन बॉक्स आणून दिले आणि अगदी मायेने व प्रेमाने सांगितले, की हे तुमच्या मुलांसाठीपण घेऊन जा. हा कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचा क्षण माझ्यासाठी खूप सुखद होता.
देशाचे माजी पंतप्रधान, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, अफाट बुद्धिमत्ता असणारे मनमोहन सिंग जी शांत, संयमी, मितभाषी व सतत कार्य मग्न असणारे नेतृत्व होते. स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर अशी माणसं महान होत असतात. आर्थिक संकटाच्या काळात देशाच्या हितासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आजच्या परिस्थितीमध्ये उपयोगी पडतात. देशाच्या राजकारणात व समाजकारणामध्ये त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी अनेक राजकीय नेत्यांशी अगदी सलोख्याचे संबंध निर्माण केले. असे सर्वसमावेश नेतृत्व आज आपल्या देशाने गमावले आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात व समाजकारणात कधीही भरून न निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे.