कुंभोज (विनोद शिंगे)
नुकत्याच झालेल्या महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूर जिल्ह्याच्या पदरात दोन मंत्री पदे पडली आहेत. हसन मुश्रीफ आणि प्रकाश अबिटकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. पण अध्याप तरी अजून पालकमंत्री कोण याबाबत उत्सुकता ताणली आहे. पालकमंत्री पदावर कोणाची वर्णी लागते याकडे आता जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्ह्यातील दोनच मंत्र्यांना या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आले आहे. हसन मुश्रीफ आणि प्रकाश अबिटकर यांच्या रूपाने हे दोन मंत्री आता कार्यरत झाले आहे. मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण मंत्री पद तर अबिटकर यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पद बहाल करण्यात आले आहे. या दोघातील मुश्रीफ यांनी यापूर्वी मंत्रिमंडळात अनेक वेळा स्थान प्राप्त केले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांनी भूषवले आहे. यातील अबिटकर यांनी दुसऱ्या टर्ममध्ये आमदारकी भूषवून त्यांना कॅबिनेट मंत्रीपद बहाल करण्यात आले आहे.
राज्यात तीन आघाड्यांचे सरकार आहे. यामध्ये भाजप वरचढ आहे. त्याच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. तर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखालील राष्ट्रवादी काँग्रेस घोडदौड करीत आहे. त्यातच अपक्षांचाही सहयोग महायुतीच्या सरकारला राहणार आहे. जिल्ह्यात अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे कागल मधून हसन मुश्रीफ, जनसुराज्येचे शाहुवाडी पन्हाळाचे विनय कोरे, आणि हातकलंगलेचे दलितमित्र अशोकराव माने, कोल्हापूर दक्षिणमधून भाजपचे अमल महाडिक, आणि इचलकरंजीमधून राहुल आवाडे, शिवसेनेचे कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर, करवीर मतदार संघातून चंद्रदीप नरके, राधानगरीतून प्रकाश अबिटकर, तर शिरोळ मधून राजेंद्र पाटील यड्रावकर राजर्षी शाहू विकास आघाडी आणि चंदगड मधून शिवाजी पाटील हे अपक्ष असे दहा आमदार निवडून आले आहेत.
जिल्ह्यात यापूर्वी चार- चार मंत्रिपद भूषवलेला हा कोल्हापूर जिल्हा सध्या दोनच मंत्र्यांवर जिल्ह्याला समाधान मानावे लागणार आहे. यापूर्वी जिल्ह्यात अनेक राजकीय बदल झाले. पण मंत्रिमंडळातील स्थान कमीत कमी चार लोकांना मिळाले होते. पण या वेळेला मात्र दोनच लोकांना संधी मिळाल्याने कोल्हापूर जिल्ह्याचा विकास कसा साधायचा याबाबत आता होणाऱ्या पालकमंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. विद्यमान मंत्रिमंडळात कोल्हापूर जिल्ह्याची ताकद कमी पडली की काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.