शिरोलीतील दलित समाज संघटनेसह विविध संघटनांनी पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

कुंभोज  (विनोद शिंगे )

परभणीतील संविधान अवमान, केंद्रीय मंत्री अमित शाहांचे वादग्रस्त वक्तव्य, बीड जिल्हयातील मस्साजोग सरपंच हत्या या सर्व घटनांच्या निषेधार्थ पुलाची शिरोलीतील दलित समाज संघटनेसह विविध संघटनांनी पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील सर्व नागरीक, व्यवसायीकांनी दिवसभर आपले सर्व व्यवहार बंद ठेवून आपल्या निषेधाच्या भावना व्यक्त केल्या.

 

परभणी येथील संविधान प्रतिकृतीची मोडतोड, आंदोलनातील कार्यकर्त्यांना मारहाण, अटक केलेल्या कार्यकर्त्याचा झालेला संशयास्पद मृत्यू, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेलं वक्तव्य. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा झालेली हत्या. या सर्व घटनांच्या निषेधार्थ मंगळवारी पुलाची शिरोली गाव बंद ठेवण्याचा निर्णय विविध समाज व संघटनांनी घेतला होता. त्यानुसार माजी सरपंच शशीकांत खवरे, शिरोलीचे माजी ग्रा. पं. सदस्य बाबासो कांबळे, तसेच रणजीत केळूसकर, सुजित समुद्रे यांच्या नेतृत्वाखालील स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी महाराज, तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बंद आंदोलन सुरू करण्यात आले. गावातून फेरी काढून बंदचे आवाहन करण्यात आले. यावेळी अनिल खवरे, राहुल खवरे, शिवाजी समुद्रे, श्रीकांत कांबळे, अमोल कांबळे, सनी शिंदे, प्रकाश कांबळे तसेच शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.