28 जिल्ह्यांमध्ये नवोदय विद्यालये स्थापन करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या आर्थिकविषयक व्यवहार समितीने नवोदय विद्यालय योजने (केंद्रीय क्षेत्र योजना) अंतर्गत देशात ज्या जिल्ह्यांमध्ये नवोदय विद्यालये नाहीत, अशा 28 जिल्ह्यांमध्ये ती स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. या सूची मध्ये महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. देशात नव्याने स्थापण्यात येणाऱ्या 28 नवोदय विद्यालयांची सूची जोडण्यात आली आहे.

 

 

देशामध्ये नवीन 28 नवोदय विद्यालये स्थापण्यासाठी एकूण अंदाजे 2359.82 कोटी रुपये इतका निधी लागणार आहे. हा निधि 2024-25 ते 2028-29 या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये खर्च केला जाईल. यामध्ये भांडवली खर्चासाठी 1944.19 कोटी रूपयांची तरतूद ठेवली आहे. तर परिचालन खर्च रु. 415.63 कोटी उपलब्ध करून दिले आहेत.

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय संरचनेत 560 विद्यार्थ्यांच्या क्षमतेसह एक पूर्ण नवोदय विद्यालय चालविण्यासाठी समितीने निश्चित केलेल्या निकषांच्या बरोबरीने पदे निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे, 560 x 28 15,680 विद्यार्थ्यांना या विद्यालयांचा लाभ घेता येईल. प्रचलित नियमांनुसार, एक पूर्ण विकसित नवोदय विद्यालय 47 व्यक्तींना रोजगार प्रदान करते आणि त्यानुसार, मंजूर करण्यात आलेल्या 28 नवोदय विद्यालयांमुळे 1316 व्यक्तींना थेट कायमस्वरूपी रोजगार मिळेल. शालेय पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी बांधकाम आणि संबंधित उपक्रमांमुळे अनेक कुशल आणि अकुशल कामगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. निवासी स्वरूपामुळे, प्रत्येक नवोदय विद्यालय स्थानिक विक्रेत्यांना अन्नधान्य, उपभोग्य वस्तू, फर्निचर, शिक्षण साहित्य इत्यादीसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी आणि न्हावी, शिंपी मोची, घरकाम आणि सुरक्षिततेसाठी मनुष्यबळ यासारख्या स्थानिक सेवा पुरवठादारांना संधी निर्माण करेल.

नवोदय विद्यालय ही पूर्णतः निवासी, सह-शैक्षणिक शाळा आहेत. ज्यामध्ये हुशार मुलांना इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतचे उत्तम दर्जाचे आधुनिक शिक्षण दिले जाते. प्रामुख्याने ग्रामीण भागातील, त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा विचार न करता, या शाळांमध्ये निवड चाचणीच्या आधारे प्रवेश दिले जातात. देशात दरवर्षी अंदाजे 49,640 विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयांमध्ये इयत्ता सहावीमध्ये प्रवेश दिला जातो.

आत्तापर्यंत, देशभरात 661 मंजूर नवोदय विद्यालये आहेत [यापैकी 20 जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जाती/जमातीच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे तिथे दोन नवोदय विद्यालय आहेत. याशिवाय देशात 3 विशेष नवोदय विद्यालये आहेत. यापैकी 653 विद्यालये कार्यरत आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी दर्शवणारी आणि इतरांसाठी आदर्श शाळा म्हणून काम करत जवळपास सर्व नवोदय विद्यालयांना पीएम श्री शाळा म्हणून मान्यता दिली आहे. या योजनेला चांगली लोकप्रियता मिळाली आहे आणि दरवर्षी नवोदय विद्यालयांमध्ये सहावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अलिकडच्या वर्षांत, नवोदय विद्यालयांमध्ये मुलींची (42%), तसेच अनुसूचित जाती (24%), अनुसूचित जमाती (20%) आणि इतर मागासवर्गीय (39%) अशी पट संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण उपलब्ध झाले आहे.

सीबीएसईने घेतलेल्या बोर्ड परीक्षांमध्ये नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांची कामगिरी सर्व शैक्षणिक प्रणालींमध्ये सातत्याने सर्वोत्तम राहिली आहे. नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी शहरी भारतातील सर्वोत्कृष्ट प्रतिभेच्या बरोबरीने अभियांत्रिकी, वैद्यकीय विज्ञान, सशस्त्र सेना, नागरी सेवा इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.