आधार कार्ड दुरुस्ती कामे करणाऱ्या केंद्रांची संख्या वाढवा आणि मनमानी करणाऱ्या केंद्र चालकांवर कारवाई करा: नागरिकांची मागणी

कोल्हापूर – महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोल्हापूर शहरात आधार कार्ड दुरुस्तीची कामे करण्यासाठी खाजगी लोकांना ही केंद्र चालवण्याची परवानगी दिली आहे. पण ग्राहक नागरिकांची या ठिकाणी या कामासाठी फार मोठी गर्दी असते, त्यामानाने शहरात या केंद्रांची संख्या कमी आहे. पोस्ट ऑफिस काही बँका व अन्य ठिकाणीही या केंद्रांची काही सुविधा आहे. पण त्या ठिकाणी कामकाजासाठी अतिशय कमी वेळ असतो.

 

 

शिवाजी पेठ परिसरात निवृत्ती चौकानजीक महापालिकेच्या दुकान गाळ्यात एक केंद्र आहे पण त्या ठिकाणी त्या केंद्र चालकाची मनमानी असते, ग्राहकांना उद्धट उत्तरे देणे निर्धारित वेळेत केंद्र चालू न ठेवणे स्वतःच्या सवडीप्रमाणे केंद्र चालू बंद करणे. कामासाठी ग्राहकांची रांग असेल तर अचानक पणे मला बाहेर जायचे आहे, माझे काम आहे, उद्या या दुपारी या अशी कारणे सांगून प्रतीक्षा रांगेत असणाऱ्या ग्राहकांची गैरसोय करतात. असे अनेक प्रकार या ठिकाणी घडतात शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे केंद्र असल्याने विशेषतः महिला वर्ग व लहान मुलांची या ठिकाणी मोठी गर्दी असते त्याचे या केंद्र चालकांना काहीच देणे घेणे नसते त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते.
कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीने आशा या आधार केंद्रांची शहरात संख्या वाढवून नागरिकांना योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि मनमानी कारभार करणाऱ्या केंद्र चालकांवर कडककारवाई करावी अशी मागणी केली आहे.