कोल्हापूर : अंत्यत प्रतिष्ठेच्या झालेल्या कोल्हापूर दक्षिण व कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात मतदान झाल्यानंतर काँग्रेससह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी धैयप्रसाद हॉल येथे जमत आमदार ऋतुराज पाटील यांना खांद्यावर घेत त्यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. तर उत्तरचे उमेदवार राजेश लाटकर यांना निकालाआधीच गुलाल लावत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील व राजेश लाटकर यांच्यासाठी मोठ्या नेटाने राबले. मतदान झाल्यानंतर काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी या दोन्ही मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे धैर्यप्रसाद हॉल येथे आभार मानले. यावेळी सतेज पाटील यांच्यासह दोन्ही उमेदवारांची भेट घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या मतदानयाद्यांची प्रक्रिया धैर्यप्रसाद हॉल येथून पार पाडली जात होती. त्यामुळे मतदान झाल्यानंतर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते धैयप्रसाद हॉल येथे जमले. सतेज पाटील यांनी त्यांच्याकडून गावांमध्ये, प्रभागांमध्ये किती मतदान झाले याचा आढावा घेत निवडणुकीतील सहकार्याबद्दल आभार मानले. दक्षिणचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील, उत्तरचे उमेदवार राजेश लाटकर यांनीही कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे आभार मानत त्यांच्याकडून आढावा घेतला. यावेळी आमदार जयंत आसगावकर, डॉ.डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.संजय डी.पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
सेल्फीसाठी झुंबड
धैर्यप्रसाद हॉल येथे दक्षिणमधील शहर, उपनगर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात होते. आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती.