कोल्हापूर : सतेज पाटील हे आज सकाळी .८ वाजता कार्यक्रमासाठी बाहेर पडताना बीड जिल्ह्यातील होतकरू आणि प्रयोगशील शेतकरी ईश्वर शिवाजी शिंदे यांनी त्यांची भेट घेतली.ईश्वर शिंदे यांना सतेज कृषी प्रदर्शनात प्रथम पुरस्काराने गौरवण्यात आले होते. या शेतकऱ्याने त्यानंतर मोठ्या कष्टाने वर्षभर टिकणाऱ्या आणि प्लास्टिक फुलांना पर्याय ठरणाऱ्या फुलांची शेती यशस्वी करून दाखवली आहे.

आपल्या अनोख्या उत्पादनाची माहिती आणि नमुना दाखवण्यासाठी ते खास बीडहून कोल्हापूरात सतेज पाटील यांना भेटण्यासाठी आल्याचं कळल्यावर पाटील हे भारावून गेले. सतेज पाटील यांच्याबद्दल ईश्वर शिंदे यांनी व्यक्त केलेले कृतज्ञतेचे शब्द आणि त्याचा साधेपणा मनाला भिडणारा होता. आता या फुलांचं पुढे काय करणार असा प्रश्न विचारल्यावर आपलं पहिलं उत्पादन अंबाबाईच्या चरणी अर्पण करून उरलेली फुलं मंदिर परिसरात विक्रीसाठी ठेवणार असल्याचं सांगितलं.
यावेळी सतेज पाटील यांनी अशा तरूण शेतकऱ्यांच्या प्रयोगशीलतेचे नेहमीच कौतुक वाटतं. आपण सुरू केलेल्या उपक्रमातून शेतकऱ्यांचं आयुष्य बदलत आहे याचं समाधान असून ते मनाला उभारी देणार आहे. अशा भेटीतून केवळ एक संवाद घडत नाही, तर एक नवा ऋणानुबंध निर्माण होतो. अशा भावना व्यक्त केल्या.
