कोल्हापूर: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य स्तरावरील व मान्यताप्राप्त राजकीय पक्ष पदाधिकारी यांच्या कार्यशाळेत निवडणूक प्रक्रिया मुक्त व निष्पक्ष वातावरणात पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले. नुकतीच लोकसभा निवडणूक प्रक्रिया जिल्हास्तरावरून पार पडली. परंतु आता विधानसभेसाठी सर्व प्रक्रिया जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात होणार आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी समन्वय ठेवून त्या त्या ठिकाणी निवडणूक अनुषंगिक प्रक्रिया पूर्ण कराव्यात. ते म्हणाले, जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात मुळ मतदान केंद्राची संख्या 3 हजार 359 असून यामध्ये मतदान केंद्राच्या ठिकाणी बदल केलेली संख्या 101 आहे तर मतदान केंद्राच्या नावात बदल केलेली संख्या 29 असून नवीन मतदान केंद्राची संख्या 91 आहे. मतदाराचे विलिनीकरण करण्यात आलेल्या मतदान केंद्राची संख्या 178 आहे. यानुसार सध्या जिल्ह्यात एकूण 3 हजार 450 मतदान केंद्र आहेत.
या कार्यशाळेत आदर्श आचारसंहिता पालन, निवडणूक खर्च आणि राजकीय जाहिरातींचे प्रमाणीकरण हे विषय होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे, वित्त व लेखाधिकारी अतुल आकुर्डे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी त्या त्या विषयांची माहिती दिली.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, दरपत्रकांबाबत काही आक्षेप असल्यास संबंधित पक्षांनी याबाबत लेखी आक्षेप नोंदवावेत. निवडणुकीच्या घोषणेनंतर एक बैठक घेऊन हे दरपत्रक अंतिम करु. जिल्ह्यात असलेल्या सर्व ईव्हीएमची प्राथमिक चाचणी करण्यात आली असल्याचेही सांगून विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणेच्या पूर्वीची आवश्यक तयारी झाली असल्याचे सांगितले.
अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी पारदर्शी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांना निवडणूक प्रक्रिया चांगल्या प्रकारे माहिती असणे गरजेचे आहे असे सांगितले. आदर्श आचारसंहिता सनियंत्रणांसाठी राजकीय पक्षांनी प्रतिनिधींची नावे निवडणूक विभागाला कळवावित. जिल्ह्यात दहा निवडणूक निर्णय अधिकारी असून या ठिकाणी काम करणाऱ्या प्रतिनिधींना योग्य संदेश जावा म्हणून निवडणूक विषयक अद्ययावत सूचना किंवा माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले आहे असे सांगितले. आदर्श आचारसंहितेत काय करावे, काय करु नये याबाबत माहिती यावेळी त्यांनी दिली.
अतुल आकुर्डे यांनी निवडणुकांवेळी होणाऱ्या खर्चाची माहिती दिली. यामध्ये निवडणूक खर्चाचे प्रकार, निवडणूक खर्च विषयक कायदेशीर तरतुदी, निवडणूक खर्च सनियंत्रण व व्यवस्थापन यंत्रणेची माहिती, निवडणूकीच्या काळात राजकीय पक्ष व उमेदवार यांनी सादर करावयाचे लेखे विषयी माहिती, खर्च सनियंत्रण समितीने निश्चित केलेली दरसूची विषयी माहिती दिली.
जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी राजकीय पक्षांच्या निवडणूक विषयक जाहिरातींना प्रमाणीकरण आयोगाच्या नियमानुसार अनिवार्य असल्याचे सांगितले. सर्व दहाही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी राजकीय जाहिरात प्रमाणीकरणासाठी जिल्हास्तरावर माध्यम कक्षात अर्ज सादर करावेत. यावेळी त्यांनी अर्ज कसा करावा, त्याचा कालावधी तसेच पेड न्यूज आदी विषय सांगितले.
प्रास्ताविकात उपजिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे यांनी मतदार यादी 30 ऑगस्ट जाहीर करण्यात आली असल्याचे सांगितले. सद्या नोंदणी सुरु असून निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या आधी 10 दिवस आलेल्या अर्जाचा समावेश यादीत होतो. मतदनाची घोषणा झाल्यावर कोणतेही नाव वगळले जात नाही. मात्र दुरुस्ती, स्थलांतर प्रक्रिया सुरू राहील. अर्ज परत घेण्याची मुदत संपली की दुरुस्तीही बंद होईल व 30 ऑगस्टपर्यंतची मतदार यादी व नवीन अर्ज मतदार यादी एकत्रित करून ती अंतिम करण्यात येणार अशी माहिती दिली.