मुंबई :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार आहेत मात्र त्याआधी सरकारतर्फे विविध निर्णय घेतला जात आहे. त्याच अनुषंगाने सरकारने डिजिटल प्रसिद्धीसाठी ९० कोटीचे टेंडर काढले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार असं म्हणत जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे.
याबाबत आपल्या एक्स हँडलवरून प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, फक्त काही दिवसांकरिता डिजिटल प्रसिद्धीसाठी महायुती सरकारने ९० कोटी रुपयांचे टेंडर काढलेले आहे. आतापर्यंत या सरकारने जवळपास दीड हजार कोटी फक्त प्रसिद्धीसाठी खर्च केले आहे. या दीड हजार कोटी रुपयांमध्ये माझ्या शेतकऱ्यांना मोठी मदत देता आली असती, माझ्या तरुणांचा कौशल्य विकास करता आला असता, माझ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे गणवेश मिळाले असते. ग्रामीण, आदिवासी भागातील किती रस्ते झाले असते. विचार करा या पैशांमध्ये किती लाडक्या बहिणींना मदत झाली असती. पण शेवटी महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार.