कोल्हापूर: महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम ‘गौरव मायमराठीचा’ भवानी मंडप येथे पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने पर्यटक, भाविक उपस्थित होते. दोन दिवसांपुर्वीच मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कलाकारांना उपस्थित श्रोत्यांनी प्रत्येक सादरीकरणाला विशेष दाद दिली. आजच्या नव्या पिढीला या कार्यक्रमातून मराठी संस्कृतीबरोबरच त्यातील बारकावे जाणून घेण्याची संधी मिळाली. अगदी पारंपरिक जाते, सुप, उखळ, पिंगळा, देवूळवाला, पारंपरिक संगीत, भजन, नृत्य आणि कला जवळून पाहता एकता आल्या. उपस्थित प्रत्येकजण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात सादरीकरण टिपून घेत असल्याचे दिसून आले.
गौरव माय मराठीचा या कार्यक्रमात भुपाळी, पिंगळा, ओवी, वासुदेव, दिंडी, शेतकरी नृत्य, झाल्या तिन्ही सांजा, कडक लक्ष्मी नृत्य, लावणी नृत्य, गाडी आणवी बुरख्याची, आदिवासी नृत्य, पोवाडा, लावणी, कोळी नृत्य अशा नृत्य गीतांमधून सादरीकरण करण्यात आले. कोल्हापुरला ऐतिहासिक परंपरा असून येथील संस्कृती, आपली वैशिष्ट्ये, येथील विजयादशमीची ऐतिहासिक परंपरा शाही दसरा महोत्सवातून जगभर पोहोचेल यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
ऐतिहासिक भवानी मंडप परिसरात जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित शाही दसरा महोत्सव २०२४ अंतर्गत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील तीन दिवस विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यात दि.७ ऑक्टोबर रोजी पारंपरिक युध्दकला प्रात्यक्षिक सादरीकरण. यात काठी व कैची, एकल पट्टा, दोघांचा पट्टा कैची, तलवार, भालाफेक, कुऱ्हाड फेक, जांभिया फेक, काठीची दोघांची लढत होणार आहे, दि. ८ ऑक्टोबर रोजी विविध क्षेत्रातील महिलांच्या सहभागातून “नवदुर्गा बाईक रॅली’ चे आयोजन केले आहे. त्याच दिवशी सायंकाळी महाराष्ट्राची शक्तीपीठे” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन भवानी मंडप येथे केले आहे. दिनांक ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता भवानी मंडप परिसर येथे पोलीस कर्मचारी बँड, मिलीटरी कर्मचारी बँड, शाळांचे व इतर नामवंत पथकांचे बँड वादन आयोजित केले आहे.
दिनांक १० ऑक्टोबर रोजी सर्व प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांसाठी कोल्हापुरचा वारसा, संस्कृती व सण परंपरा या विषयावर आधारीत निबंध स्पर्धा, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी श्री अंबाबाई देवीच्या नगरप्रदक्षिणा मार्गावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन, दिनांक १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावर दसऱ्यानिमित्त शाही स्वारीचे आयोजन केले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू, ढोलवादन पथके, लेझीम पथके, झांज पथक, शिवकालीन वेशभूषेमधील मावळे, मर्दानी खेळाची पथके, मल्लखांब पथके, ११ घोड्यांसमवेत ११ मावळे, १० मावळे-अब्दागिरीसह यांचा समावेश असणार आहे.