महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कधी होणार? काय म्हणाले आयुक्त…

मुंबई : नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र दौरा केला. यावेळी त्यांनी केलेल्या निरीक्षणानंतर शनिवारी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये ‘आमचं महाराष्ट्र, आमचं मतदान’ असे टॅगलाईन असल्याचे सांगितले. तसेच, यावेळी त्यांनी तब्बल 11 राजकीय पक्षांसोबत चर्चा केली असल्याचे सांगितले. निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन तपशीलवार माहिती दिली, पण निवडणुकीच्या तारखांची घोषणा मात्र योग्य वेळी करू, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जाहीर केले.

 

महाराष्ट्राच्या दौऱ्यात दोन दिवसांपासून राजकीय पक्षांशी चर्चा झाली. सण, उत्सव पाहून निवडणुका घोषित करा, असं राजकीय पक्षांचं म्हणणं आहे. आम्ही 11 राजकीय पक्षांशी चर्चा केली. पैशांची ताकद रोखण्याची विनंती काही पक्षांनी केली. पोलिंग स्टेशन दूर आहेत. वृद्धांना येण्याजाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्याची मागणी केली, असे राजीव कुमार यांनी सांगितले. पोलिंग एजंट त्याच मतदारसंघाचा असावा अशी काही पक्षांनी विनंती केल्याच निवडणूक आयोगाने सांगितलं. मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास मनाई करण्याची मागणीही पक्षांनी केली. फेक न्यूज रोखण्याची मागणी त्यांनी केली. फेक न्यूज कसे रोखणार याची माहिती आम्ही दिली, असे ते म्हणाले.

यावेळी पत्रकार परिषदेत राजीव कुमार म्हणाले की, “महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 मतदारसंघ आहेत. तसेच, राज्याच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक त्याआधीच होणार आहेत. राज्यात एकूण 9.59 कोटी मतदार असून त्यामध्ये 4.59 कोटी पुरुष मतदार तर 4.64 कोटी महिला मतदार आहेत. आम्ही तृतीय पंथीय, वृद्ध तसेच दिव्यांग मतदारांसाठी विशेष व्यवस्था करणार आहोत.” अशी माहिती त्यांनी दिली. तसेच ते पुढे म्हणाले की, “वृद्ध मतदारांना मतदान करण्यासाठी आम्ही मत देण्याची विनंती करतो. त्यांना केंद्रात जाणे शक्य नसेल तर घरुन मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन दिली जाणार आहे. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची संख्याही महाराष्ट्रात चांगली असून 19.48 लाख मतदार हे नवीन मतदार आहेत. हे तेच मतदार आहेत जे लोकशाहीला पुढे घेऊन जातील,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

🤙 9921334545