इचलकरंजीत येथे 11 हजार महिलांच्या उपस्थितीत हरिपाठ जागर आणि भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन

कुंभोज (विनोद शिंगे)
ज्ञानेश्‍वरी परिष्करण (शुध्दीकरण) दिनाच्या निमित्ताने संतांचे विचार घरोघरी पोहचावेत आणि समाज सृजनशील, निकोप विचारांचा व व्यसनमुक्त व्हावा यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांची संकल्पना व डॉ. राहुल आवाडे यांचे मार्गदर्शनाखाली श्री काळामारुती आरती भक्त महिला मंडळ यांच्या वतीने तब्बल 11 हजार महिलांच्या उपस्थितीत इचलकरंजी येथे रविवार 29 सप्टेंबर सकाळी 9 वाजता संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांचा हरिपाठ सामुदायिक पठण व दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येथील केएटीपी मैदानावर हा अनोखा सोहळा संपन्न होत असून शहरातील प्रमुख मार्गावरुन हा भव्य असा दिंडी सोहळा निघणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथमच इचलकरंजीत भव्यदिव्य प्रमाणात हा सोहळा होत असून संपूर्ण वस्त्रनगरी विठ्ठलनामाच्या गजरात तल्लीन होणार आहे.

 

या सामुदायिक हरिपाठ पठण आणि भव्य दिंडी सोहळ्यात एकाचवेळी 11 हजार महिलांचा सहभाग असणार आहे. त्याचबरोबर हजारो पताका, 151 पखवाज यासह संतांच्या वेशभूषेतील बालचमू रथात विराजमान असणार आहेत. यामध्ये शहरातील विविध भागातून येणार्‍या दिंड्या सहभागी होणार आहेत. केएटीपी मैदान येथे सामुदायिक हरिपाठ झाल्यानंतर दिंडी सोहळ्याला सुरुवात होईल. ही दिंडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, श्री शिवतीर्थ, कॉ. मलाबादे चौक, महात्मा गांधी पुतळा, सुंदरबाग, मराठे मिल कॉर्नर, महेश सेवा समिती आणि योग जिम्नॅशियम भवन मैदान अशी निघेल. जिम्नॅशियम मैदान येथे या सोहळ्याची सांगता होईल.
11 हजार महिला, माऊलींचा अखंड गजर आणि टाळ-मृदुगांचा निनाद संपूर्ण शहरात घुमणार आहे. न भूतो न भविष्यती असा हा दिंडी सोहळा इचलकरंजीकरांना रविवारी प्रत्यक्ष अनुभवास मिळणार आहे. या दिंडी सोहळ्यात सर्वच नागरिकांनी सहभागी होऊन ऐतिहासिक अशा सोहळ्याचे साक्षीदार बनावे, असे आवाहन काळा मारुती आरती भक्त महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.