कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)
2024 मध्ये इंगळी गावामध्ये महापूर आला होता, या महापुरातील पूरबाधित नागरिकांना अद्यापही सानुग्रह अनुदान मिळालेले नाही, हे सानुग्रह अनुदान नागरिकांना मिळण्याकरता स्थानिक पातळीवरून तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जाण्यास विलंब केला जात होता त्यामुळे मा.आम.डॉ. सुजित मिणचेकर व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली इंगळी गावातील शिवसेना शहरप्रमुख केशव पाटील तसेच अण्णासो येळवडे, महादेव कुंभार, रामा गायकवाड, बजरंग लोंढे, प्रकाश गताडे, संदीप बिरांजे, रमेश लोहार यांनी प्रशासना विरोधात आमरण उपोषण सुरू केले होते.
दरम्यान हातकणंगले विधानसभेचे मा. आम. डॉ. सुजित मिणचेकर व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी उपोषण स्थळी भेट देऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांना उपोषण स्थळी बोलावून सदरील पूरबाधित नागरिकांना लवकरात लवकर सानुग्रह अनुदान योजना मिळावी याकरिता स्थानिक पातळीवरील प्रस्ताव जलदगतीने बनवावा आणि ज्या पूरबाधित असलेल्या नागरिकांची नावे यादीतून वगळली आहेत अशा नागरिकांना देखील या यादीमध्ये समाविष्ट करून त्यांना देखील सानुग्रह अनुदान लागू करावे अशा सूचना उपस्थित अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, मंडळ अधिकारी जानकी मिराशी, ग्रामसेवक सुनील हासुरे व तलाठी गवंडी यांना दिल्या. डॉ. सुजित मिणचेकर यांनी जिल्हाधिकारी यांना फोन करून संबंधित प्रस्ताव आपल्याकडे प्राप्त झाल्यास तात्काळ त्यावर कार्यवाही करावी आणि लवकरात लवकर शासन दरबारातून इंगळी गावातील पुरबाधित नागरिकांना या सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ मिळवून देण्यासंबंधात सूचना केल्या.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी स्थानिक पातळीवरून पूरबाधित नागरिकांना सानुग्रह अनुदान योजना लागू होण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यास दिरंगाई केल्यास पुढील काळात होणाऱ्या आंदोलनास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील व पुढील आंदोलन प्रशासन विरुद्ध शिवसेना कोल्हापूर जिल्हा असे होईल असा सज्जड दम दिला
उपोषण स्थळी इंगळी गावचे सरपंच दादासो मोरे, ग्रामपंचायत सदस्य जिनेन्द्र ऐतवडे, मा. सरपंच रावसाहेब पाटील, सामाजिक कार्यकर्ते वीरकुमार शेंडुरे, जयकुमार देसाई, शिवसेना उपविभाग प्रमुख उमेश शिंदे, गणेश नाईक, केदार नाईक, डॉ. भीमराव पाटील, विकास भातमारे, आप्पासाहेब मोरे, विकास मोरे, आप्पासो बिरांजे, प्रशांत कांबळे तसेच इतर शिवसैनिक इंगळी ग्रामस्थ व पुरबाधित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.