मुंबई : भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकरी विरोधी असून सोयाबीन, कापूस, ऊस, कांदा, धान उत्पादक शेतकरी अनेक समस्यांचा सामना करत आहे. शेतमालाला भाव मिळत नाही, निर्यात करु शकत नाही आणि सरकार काहीच पावले उचलत नाही. समस्यांच्या गर्तेत सापडलेला शेतकरी आत्महत्या करत आहे. आज महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होत आहेत. महागाई व बेरोजगारीने जनता त्रस्त आहे पण भाजपा सरकारला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. टेंडर काढणे, भ्रष्टाचार आणि पैसा वसुली एवढेच सरकारचे काम सुरु आहे, असा घणाघाती हल्ला प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे.
प्रदेश काँग्रेसची विभागीय आढावा बैठक चंद्रपूरात संपन्न झाली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खा. प्रतिभा धनोरकर, खा. नामदेव किरसान, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, आ. अभिजित वंजारी, आ. विकास ठाकरे, माजी मंत्री अनिस अहमद, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, रामकिशन ओझा, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान झालो तर पहिली सही शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर करेन, डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करेन, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करेन असे नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली विदर्भाच्या भूमितूनच सांगितले होते. शेतकऱ्यांच्या आशिर्वादाने नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पण त्यानंतर मात्र मोदींनी, हे तर चुनावी जुमले होते, असे म्हणत पलटी मारली. शेतकऱ्यांविरोधात तीन काळे कायदे आणून शेतकऱ्यालाच उद्ध्वस्त करायचे धोरण मोदी व भाजपाने आणले होते. शेतकऱ्यांना आंदोलनजीवी, खलिस्तानी, नक्षलवादी, अतिरेकी म्हणून त्यांचा अपमान केला. आता निवडणुका आल्या म्हणून मोदींना शेतकऱ्यांची आठवण आली. वर्ध्याच्या सभेत मोदी म्हणाले की, शेतकरीच पोशिंदा आहे, शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, सोयाबिनला १० हजाराचा भाव देऊ असे सांगितले. विरोधी पक्षात असताना भाजपाने सोयाबिनला ६ हजार रुपये भाव मिळावा म्हणून मोर्चा काढला होता आणि सत्तेत आहेत तर ४ हजार रुपये भाव देत आहेत. खतांचे भाव वाढले, डिझेलचा भाव वाढला, बि, बियाणांचा भाव वाढला पण शेतमालाचा भाव काही वाढला नाही. भाजपा शेतकरी विरोधी आहे.
राज्याच्या ७६ टक्के भागात दुष्काळ आहे, अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे पण भाजपा सरकारने तेलंगणाला ४ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले परंतु महाराष्ट्राला मात्र फुटकी कवडीही दिली नाही. केंद्र व राज्यातील भाजपा सरकार जाणिवपूर्वक शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. भाजपा युती सरकार सर्व आघाड्यांवर फेल आहे पण भ्रष्टाचारात मात्र अग्रेसर आहे.
असेही पटोले म्हणाले.
विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, लोकसभा निवडणुकीला लोकशाही व राज्यघटना वाचवण्यासाठी जनतेने मतदान केले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर जनतेमध्ये जो रोष होता तो त्यातून व्यक्त करण्यात आला. महायुती सरकारची जडण घडणच भ्रष्टाचारातून झाली आहे. त्यासाठी ज्या साधनांचा त्यांनी वापर केला ते जनता ओळखून आहे. सत्तेवर जाण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची तोडफोड केली. राज्यात शांतता सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, महिला अत्याचार वाढले आहेत, अंमली पदार्थांचा काळा धंदा वाढला आहे. सत्ताधारी पक्षाचा आमदार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतो. जमीन व्यवहारातून सरकारने मोठा भ्रष्टाचार केला आहे. सरकारी पैशाची उधळपट्टी सुरु आहे असे हे भ्रष्ट सरकार घालवण्याची जनतेची इच्छा आहे. लोकसभेपेक्षा विधानसभेला चांगला प्रतिसाद मिळेल व मविआ सत्तेवर नक्की येईल याचा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सरकारवर तोफ डागत म्हणले की, महाराष्ट्रातील सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहे. महाराष्ट्राची अस्मिता गुजरातकडे गहाण ठेवली असून २९ प्रकल्प गुजरातला पळवले आहेत. प्रकल्प गेला नाही असे देवेंद्र फडणवीस छाती फोडून सांगत असले तरी १८ हजार कोटी रुपयांचा सोलर पॅनलचा प्रकल्प गुजरातला पळवला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात गुंतवणूक होणारे ३ लाख २८ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचे काम केले आणि गुजरातचे ड्रग महाराष्ट्र आणून तरूणांना बरबाद केले आहे. ५ लाख कोटी रुपयांच्या जमिनी गुजराती उद्योगपतींच्या खिशात घातल्या आहेत.