“प्रारंभिक शिक्षण: परिवर्तनाची दिशा” या विषयावर राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात येत्या २६ व २७ सप्टेंबर रोजी “प्रारंभिक शिक्षण: परिवर्तनाची दिशा” या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात हा परिसंवाद होईल. ही माहिती डॉ. चेतना सोनकांबळे आणि डॉ. रामचंद्र पवार यांनी दिली

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० यामध्ये वय वर्षे ३ ते ८ हा वयोगट प्रारंभिक शिक्षणाचा वयोगट म्हणून निश्चित केलेला आहे. हे वय आता शासनाने अधिकृतरित्या औपचारिक शिक्षणाच्या चौकटीत अंतर्भूत केलेले आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधील प्रारंभिक शिक्षणातील मुलभूत तरतुदी, आणि दृष्टिकोन शिक्षक – पालकांनी जाणून घेणे गरजेचे आहे. भाषा शिक्षण, गणित शिक्षण, कला शिक्षण या प्राथमिक शिक्षणातील प्रमुख विषयांच्या अध्ययन शास्त्रात सुरु असलेल्या नव्या संशोधनाचे शिक्षकांसोबत आदान – प्रदान होणे देखील महत्वाचे आहे.

शिवाय बदलत्या जगातील तंत्रज्ञान, स्पर्धा, मानसिक संगोपन या मुद्द्यांच्या अनुषंगाने नव्या पिढीच्या शिकण्या – शिकवण्यातील आव्हानांचा वेध घेणेही गरजेचे आहे. याबद्दल तज्ज्ञांकडून जाणून घेण्यासाठी आणि त्यावर विस्तृत चर्चा घडवून आणण्यासाठी, शिवाजी विद्यापीठाचा शिक्षणशास्त्र अधिविभाग, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि सृजन आनंद विद्यालय, बुनियादी शिक्षण केंद्र संचालित फुलोरा बालवाडी आणि श्रीमती लीला बापूसाहेब पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष परिसंवाद आयोजित केला आहे.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते परिसंवादाचे उद्घाटन होईल. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांची विशेष उपस्थिती असेल. उदघाटनप्रसंगी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड चे संस्थापक डॉ. विवेक सावंत यांची प्रमुख उपस्थिती असून त्यांचे ‘तंत्रज्ञानाचा शिक्षणातील विवेकी’ वापर या विषयावर विशेष व्याख्यान होईल.

पुणे येथील एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या प्रा. नलिनी पाटील, ‘नवीन शैक्षणिक धोरणा’विषयी मांडणी करतील. दोन दिवसीय परिसंवादात गणिताविषयी निलेश निमकर, भाषेविषयी मानसी महाजन, कलेविषयी आभा भागवत, मानसिक आरोग्यासंदर्भात देवव्रत हर्षे हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी सृजन आनंद विद्यालयाच्या शिक्षकांनी लिहिलेल्या ‘घाट – शिकण्या-शिकवण्याचा’ व फुलोरा बालवाडीच्या शिक्षकांनी लिहिलेल्या ‘फुलोरा फुलताना’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. या परिसंवादाला शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.