मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असून महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास निश्चित झालं आहे. असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २८८ पैकी १०० जागा काँग्रेस, १०० जागा उद्धव ठाकरेंची शिवसेना तर ८४ जागा शरद पवारांची राष्ट्रवादी लढेल, तर उर्वरित ४ जागा मित्र पक्षांसाठी सोडल्या जाणार असल्याची माहिती आहे काही जागांवर अजूनही तिढा कायम पण लवकरच सोडवला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
महाविकास आघाडीचे जवळपास ८० टक्के जागा वाटपावर चर्चा पूर्ण झाली आहे. विदर्भ सोडून महाराष्ट्रातील उर्वरित जागावाटपाची चर्चा करण्यात आली आहे. १२० ते १३० जागांवर महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये सहमती झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तिढा असलेल्या जागांवर दुस-या टप्प्यात चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जवळपास जागा त्याच पक्षाला जागा वाटपात दिल्या गेल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या पक्षीय बलाबल पाहता काँग्रेसकडे सर्वाधिक आमदार आहेत, तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फुटल्याने महाविकास आघाडीत आम्हीच मोठा भाऊ असं काँग्रेस नेत्यांकडून सातत्याने सांगण्यात येत होते. उद्धव ठाकरेंची शिवसेना सुद्धा लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेसाठीही जास्त जागांची मागणी करत होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षही लोकसभेत कमी जागा घेतल्याने विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागांसाठी आग्रही होता. त्यामुळे महाविकास आघडीत जागावाटपावरून तिढा पडण्याची शक्यता होती. मात्र महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास ठरल्याचे चित्र आता स्पष्ट झालं आहे.