कोल्हापूर जिल्हा परिषद टाकाऊपासून टिकावू वस्तू तयार करण्याचा उपक्रम राबविणार

कोल्हापूर : स्वच्छता ही सेवा मोहीम 2024 दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार स्वच्छतेचे विविध उपक्रम या कालावधीत राबविण्यात येत आहेत. या पंधरवड्यात शासनाने दिलेल्या उपक्रमाबरोबरच पर्यावरण पुरक व विद्यार्थांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील कुटुंबांना कापडी पिशवी वाटप करणे, प्लास्टीक ब्रिक्स तयार करणे आणि टाकाऊ वस्तूंपासुन टिकावू वस्तु तयार करणे असे विशेष उपक्रम ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली आहे.

 

स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर कचरा साचलेली ठिकाणे निश्चित करुन श्रमदान करणे, सार्वजनिक ठिकाणी श्रमदान करणे, लोकसहभाग आणि जनजागृतीपर विविध उपक्रम राबविणे यासारखे उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमा व्यतिरिक्त कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत तीन विशेष उपक्रम राबविले जाणार आहेत.

कापडी पिशवी वाटप उपक्रम- जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कुटुंबांना ग्रामपंचायती मार्फत 1 लाख कापडी पिशवी वाटप करण्याचा विशेष उपक्रम राबविला जाणार आहे. प्लास्टीक पिशवीला पर्याय, कापडी पिशवीच्या जनजागृतीसाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ग्रामपंचायत निधी, सीएसआर मधुन या कापडी पिशव्या घेण्यात येणार आहेत. या पिशवीवर स्वच्छता ही सेवा 2024 चे बोधचिन्ह व ग्रामपंचायतीचे नाव प्रिंट करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 1 लाख कापडी पिशवी वाटपाचे उद्दीष्ट असुन तालुक्यातील कुटुंब संख्येच्या प्रमाणात तालुक्यांना कापडी पिशवी वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे.

कापडी पिशवी वाटप 1 लाख तालुका निहाय उद्दीष्ट

आजरा- 4535, भुदरगड-6445, चंदगड-7035, गडहिंग्लज-8475, गगनबावडा- 1446, हातकणंगले- 15596, कागल-8217, करवीर-15619, पन्हाळा-9588, राधानगरी-7592, शाहुवाडी- 6417, शिरोळ-9035
प्लास्टीक ब्रिक्स तयार करणे उपक्रम – प्लास्टीकच्या बाटलीमध्ये अधिक अधिक प्लास्टीक कचरा भरणे. ( प्लास्टीक पिशवी, रॅपर, लहान आकाराचे प्लास्टीक ) यापासुन प्लास्टीक विट तयार करण्यात येणार आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्याचा सहभाग घेण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्लास्टीक विषयाबाबत अधिक माहिती मिळेल.

स्पर्धा – या बाबतचे मुल्यांकन निकष निश्चित करुन तालुका गट शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहेत. दिनांक 10 ऑक्टोबर 2024 नंतर याचे मुल्यांकन होवून प्रति तालुका 3 उत्कृष्ट क्रमांक जिल्हा स्तरावर सादर करण्यात येणार आहेत. उत्कृष्ट विद्यार्थांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवुन गौरविण्यात येणार आहे.

सजावटीसाठी वापर- या प्लास्टीक बाटलींचा सजावटीसाठी शालेय परिसरात वापर करणे (झाडा भोवती कट्टा करणे, सजावटाची भिंत तयार करणे आदी )

टाकाऊ वस्तू पासुन टिकावू वस्तू तयार करणे- वेस्ट टु आर्ट हा उपक्रम सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. वापरात नसलेल्या वस्तुंचा पुर्नवापर करुन विद्यार्थ्यांनी आपल्या नाविन्यपुर्ण कल्पनातुन टिकावू वस्तुंची निर्मीती करण्यात येणार आहे. यामध्ये उत्कृष्ट आणि नाविन्य पुर्ण असलेल्या प्रत्येक तालुक्यातील पाच वस्तु या जिल्हा स्तरावर सादर केल्या जाणार आहेत. या वस्तुवर विद्यार्थी नाव, शाळेचे नाव नोंद करुन जिल्हा स्तरावरील कार्यालयामध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.