ऊसतोड कामगारांना आवश्यक सुविधा देण्यासाठी डेटा बेस तयार करा : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी आपल्याकडे आलेल्या कामगारांचा डेटा बेस तयार करावा. हंगाम सुरू होण्यापूर्वी कामगार जिल्ह्यात दाखल होताच त्यांची नावे, संपर्क क्रमांक, आधार क्रमांक जमा करून जिल्हा समितीकडे पाठवावा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात ऊसतोड कामगारांच्या अनुषंगिक जिल्हास्तरीय समितीची त्रैमासिक बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सोबत सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे, पोलीस उप अधिक्षक प्रिया पाटील यांच्यासह जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, कामगार विभाग, महिला व बालकल्याण विभाग यांचे प्रतिनिधी तसेच अशासकीय सदस्य उपस्थित होते.

यावेळी, ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देण्याबाबत चर्चा झाली. यासाठी शासनाकडून ग्रामसेवकांऐवजी बाह्य संस्थेची नेमणूक करण्यात असल्याचे परिपत्रकाद्वारे कळविले आहे. परंतू अद्याप संबंधित संस्थेची निवड झाली नाही. ती प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर ओळखपत्र देणेबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त साळे यांनी सांगितले. इतर विषयांवर चर्चा करताना जिल्हाधिकारी येडगे यांनी कामगारांना आवश्यक सुविधा देण्यासाठी चांगले नियोजन करण्याच्या सूचना सर्व विभागांना व कारखान्यांना दिल्या.

या बैठकीत महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटना शाखा कोल्हापूर यांच्या प्राप्त निवेदनावर चर्चा झाली. तसेच मयत ऊसतोड कामगार यांच्या कुटुंबियास तसेच वारसास अर्थिक सहाय्य अर्थिक सहाय्य देण्याबाबत प्राप्त दोन प्रस्तावांवर चर्चा झाली. ते यावेळी म्हणाले, कामगारांसोबत त्यांचे कुटुंबातील इतर व्यक्ती यात वृद्ध व बालकांची तसेच जनावरांची माहिती गोळा करावी. कामगारांना आवश्यक रेशन देण्यासाठी कारखान्यांनी त्याबाबतची माहिती आणि मागणी त्या त्या तालुक्यातील तहसिलदारांकडे द्यावी. कामगारांसोबत आलेल्या स्थलांतरीत बालकांना शिक्षण सुविधा देण्यासाठी चांगले नियोजन करा. तसेच सोबत आणलेल्या जनावरांना आवश्यक लसीकरण दिले का याची खात्री करा. याबाबत जर काही जनावरांचे लसीकरण शिल्लक असेल तर त्या त्या तालुक्यात पशु वैद्यकीय अधिकारी यांना यादी कळवा. स्थलांतरीत कामगारांसोबत आलेल्या शालेय विद्यार्थ्यांची त्या त्या जिल्ह्यातील शाळांमधील शिक्षण हमी कार्ड घेवून येण्यास कामगारांना सांगावे. जेणेकरून याठिकाणी त्यांना तातडीने प्रवेश देता येईल.

या सर्व प्रक्रियेसाठी कारखानास्तरावर एक टीम नेमून त्यांनी आवश्यक माहिती घेण्यासाठी व सुविधा पुरविण्यासाठी मदत करावी. शाळा कामाच्या ठिकाणापासून खूप दूर असतील मुलांना जवळील शाळेत पोहच करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करावी अशा सूचनाही या बैठकीत दिल्या. आपत्तीविषयक तसेच आगीची घटना घडल्यास त्याची माहिती जिल्हा कक्षास तातडीने कळवावी. आरोग्य शिबीरांचे आयोजन करून महिलांना, गरोदर महिलांना, ० ते ६ वयोगटातील बालकांना आरोग्य सुविधा पुरविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. विशेषता त्यांची रूटीन तपासणी करावी. त्या त्या भागातील आरोग्य केंद्रांनी सर्व कामगार कुटुंबांना उपलब्ध सर्व आरोग्य सेवा देण्याचे निर्देश त्यांनी बैठकीत दिले. कारखान्यांनी ऊसतोड कामगार ज्या भागात काम करणार आहेत त्यांचा स्थळ निश्चितीचा नकाशा तयार करावा. यात आक्षांस रेखांश नमूद असवा. जेणेकरून आवश्यक सेवा सुविधा त्यांना पुरविण्यास मदत होईल. तसेच प्रशासनाकडून याबाबत तपासणी करण्यासाठी मदत होईल.