भाजपची पहिली यादी सोमवारी जाहीर होणार

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून लवकरच निवडणूक जाहीर होईल अशी परिस्थिती आहे. महायुतीमधील मोठा भाऊ असलेल्या भाजपाने बैठकांचा धडाका लावला असून उमेदवारांची चाचपणी देखील सुरु केली आहे. सोमवार दि. २३ रोजी मुंबईत भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून यात पहिल्या पन्नास उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

विधानसभेच्या निवडणुकीची राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरून सध्या रस्सीखेच सुरु आहे. महायुमीमधील मोठा भाऊ असलेल्या भाजपाने विभागवार बैठका घेवून पदाधिकाऱ्यांना जनतेच्या दरबारात जाण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी भाजपाच्या स्थानिक इच्छुकांनी उमेदवारीवर दावा सांगितल्यामुळे वातावरण ढवळून निघत आहे. त्यामुळे आता काही राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या नावांची संभाव्य यादी निश्चित केल्याची माहिती पुढे आली आहे. यात भाजपने आघाडी घेतलेली असून येत्या सोमवारी या संदर्भात मुंबईत बैठक होणार आहे.

या बैठकीला भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे उपस्थित राहणार आहे. या बैठकीत भाजपच्या विद्यमान आमदारांपैकी भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात जनाधार दिसून आलेल्या पहिल्या पन्नास संभाव्य इच्छुक विद्यमान आमदारांची यादी निश्चित केली जाणार आहे.