रस्त्यावर उभे राहण्याच्या कारणावरून कोल्हापुरात दोन गटात जोरदार हाणामारी

कोल्हापूर: भोई गल्लीतील दोन गटात रस्त्यावर उभे राहण्याच्या कारणावरून जोरदार हाणामारी व दगडफेकीचा प्रकार गुरुवारी (ता. 19)रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. या मारहाणीत सचिन संभाजी मोरे (वय44), निलेश नंदकुमार यादव (34) रोहित सचिन कांबळे (29)व अभय विश्रांत पवार (21, सर्व रा. भोई गल्ली) हे जखमी झाले.या दगडफेकीत दोन दुचाकींचे नुकसान झाले. या घटनेनंतर भोई गल्ली येथे पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

याबाबत सविस्तर माहिती अशी, बिंदू चौकातून भोई गल्लीत जाणाऱ्या रस्त्यावरील ब्लू स्टार ग्रुप जवळ काही तरुण बोलत थांबले होते, यावेळी इथून निलेश यादव मोटरसायकल वरून पुढे जात होता. येथे थांबलेले तरुणांना त्यांनी बाजूला होण्यास सांगितले. यावेळी त्या तरुणांचा आणि निलेशचा वाद झाला. त्यानंतर दोन गट समोरासमोर येऊन दगडफेकीचा प्रकार घडला. यामध्ये अन्वर शेख, गौस बागवान यांच्या दारात उभा केलेल्या वाहनांची जमावाकडून नुकसान करण्यात आले.

दगडफेक व मारहाणीची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक आप्पासो पवार, पोलीस निरीक्षक दिलीप पवार, संजीव कुमार झाडे, उपनिरीक्षक भगवान गिरी, संतोष गळवे, विठ्ठल जाधव यांच्यासह फौजफाटा भोई गल्ली येथे दाखल झाला. रात्री उशिरापर्यंत जबाब नोंदवण्याचे काम सुरू होते.