मुंबई : विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना जीवघेण्या धमक्या देणाऱ्या सताधारी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या बेताल नेत्यांविरोधात काँग्रेसने राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन केले. खासदार राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्यांना भाजपा-शिवसेनेने आवर घालावा व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मीरा भाईंदर येथे प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेटट्वार, माजी मंत्री सतेज बंटी पाटील, हुसेन दलवाई, आमदार भाई जगताप यांच्यासह नेते, पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन करत भाजपाच्या तालिबानी वृत्तीचा निषेध केला. मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा येथील घरासमोर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे निलंबन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रविंद्र धंगेकर, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शिरीष कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली बाजार समिती गेटवर शिवसेना आमदार संजय गायकवाड, भाजप नेते अनिल बोंडे, तरविंदर सिंग मारवाच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी बाजार समिती सभापती संजय जाधव, शहर अध्यक्ष नंदकुमार कोतवाल यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील आकाशवाणी चौकात शहर जिल्हाध्यक्ष शाम तायडे यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना (UBT )व राष्ट्रवादी काँग्रेसचे(SP) नेतेही आंदोलनाला उपस्थित होते. यावेळी भाजपाचा तरविंदर मारवा, रवनीत बिट्टू, अनिल बोंडे व शिंदे गटाचा संजय गायकवाड यांच्या अटकेची मागणी करण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे जळगावच्या माजी महापौर जयश्रीताई महाजन यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोके आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शेख युसूफ, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश सरचिटीस जितेंद्र देहाडे, जगन्नाथ काळे, योगेश मसलगे, इब्राहिम पठाण, किरण पाटील डोणगावकर, भाऊसाहेब जगताप यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
नागपूरमध्ये माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजीत वंजारी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन करुन वाचाळविरांचा निषेध करत कारवाई करण्याची मागणी केली.
नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीनेही आंदोलन करून वाचाळविरांचा निषेध केला. कोल्हापुर काँग्रेस कमिटीनेही आंदोलन करून धमक्या देणाऱ्यांचा धिक्कार केला.