कोल्हापूर : माजी नगरसेवक आणि उद्योजक असलेल्या व्यक्तीला डिजिटल अरेस्ट केली होती. शिवाय त्यांना धमकावून त्यांच्याकडून ऑनलाइन लाखो रुपये लुटले आहेत. या घटनेमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.
कोल्हापुरातील उदय दुधाने हे उद्योजक आहेत तसेच ते माजी नगरसेवक ही होते. त्यांना एक दिवस व्हाट्सअप कॉल आला. व राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी असल्याचे संबंधित व्यक्तीने सांगितले. तुम्ही एका दहशतवादी संघटनेला मदत केल्याची आमच्याकडे माहिती असल्याचे त्या व्यक्तीने दुधाने यांना सांगितलं. हा गंभीर गुन्हा आहे देशाविरोधात तुम्ही कृती केली आहे. त्यामुळे यंत्रणेचे अधिकारी तुमच्या मागावर असून तुम्हाला मारूनही टाकले जाईल. त्यामुळे तुम्ही डिजिटल अरेस्टमध्ये राहा. त्यानंतर उदय दुधाने यांनी स्वतःला डिजिटल अरेस्ट करून घेतली. ते शिवाजी पार्क मधील हॉटेलमध्ये लपून बसले होते. वारंवार अधिकारी असल्याचे कॉल त्यांना येत होते. शिवाय मारून टाकण्याची धमकी ही हा अधिकारी देत होता. त्यातून मार्ग काढण्यासाठी दुधाने यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली. हे पैसे ऑनलाईन द्यावीत असे सांगण्यात आलं. त्यामुळे त्यांनी तब्बल 81 लाख रुपये या लोकांच्या बँक खात्यात जमा केले.
पैसे जमा केल्यानंतर दुधाने यांना फोन येणे बंद झालं त्यावर कॉल करण्याचा प्रयत्न केला तरीही तो कॉल लागला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाली आहे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राजाराम पोलीस ठाण्यात धाव घेतली व पोलिसांना हा सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.