कोल्हापूर : आरडेवाडी (ता.करवीर) येथील महिलेने राहत्या घरी साडीने तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केली. पतीकडून कर्जाचे हप्ते भरण्यासाठी माहेर कडून पैसे आणण्यासाठी तगादा लावून मारहाण केल्याने व दीराकडून प्रॉपर्टीच्या वाटणीवरून वाद घालून शारीरिक जाच करून मानसिक त्रास दिल्याच्या कारणावरून या महिलेने आत्महत्या केली आहे.
स्नेहल सागर आरडे (वय 25) असं त्या महिलेचे नाव असून ,यामध्ये पती सागर नामदेव आरडे व दिर उत्तम नामदेव आरदे या दोघांवर करवीर पोलिसात गुन्हा नोंद झाला. रात्री उशिरा उत्तम आरडेला अटक करण्यात आली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, हसुर दुमाला (ता. करवीर) येथील स्नेहल झांजगे यांचा विवाह आरडेवाडी येथील सागर नामदेव आरडे यांच्याशी चार वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना तीन वर्षाची मुलगी आहे. स्नेहल यांचा डीएमएलटी कोर्स झाल्यामुळे त्यांनी व सागर यांनी कोल्हापूरमध्ये रक्त तपासणीची लॅब सुरू केली होती.
पती सागर आरडे हे स्नेहल यांना कर्जाची हप्ते भरण्यासाठी माहेरून पैसे आणण्यास लावून मारहाण करत होते. तर दीर उत्तम येईल घरच्या व प्रॉपर्टीच्या वाटणीवरून वाद घालून स्नेहल ला मानसिक व शारीरिक जाच करत होते. या दोघांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.