वडणगे येथील शिवपार्वती तलावासाठी, 14 कोटी 98 लाखाच्या प्रस्तावाला मिळाली शिखर समितीची अंतिम मान्यता ; माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या पाठपुराव्याला यश.

कोल्हापूर : वडणगे(ता. करवीर ) येथे “शिवपार्वती तलाव” आहे. जवळपास 25 ते 30 एकर जागेमध्ये हा तलाव आहे. येथील शिवपार्वती मंदिर हे ब-वर्ग तिर्थक्षेत्र असून वर्षभरात पाच लाखाहून अधिक लोक इकडे येत असतात. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने हे खूप महत्वाचे ठीकाण आहे. गेली काही वर्षे प्रलंबित असणारा हा प्रश्न अखेर, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या प्रयत्नांनी निकाली लागला आहे. प्रादेशिक पर्यटन योजनेमधून या तलावाच्या कामासाठी 14 कोटी 98 लाखाच्या प्रस्तावाला आज (दि. ५ सप्टेंबर २०२४) शिखर समितीचीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी अंतिम मान्यता दिली.

 

 

 

वडणगे हे 20 हजाराहून अधिक लोकसंख्या असलेले गाव असून आजूबाजूची अनेक गावांतून लोकांची इकडे ये-जा असते. कोल्हापूर शहरापासून अगदी जवळ तर, जोतिबा आणि पन्हाळापासून अनुक्रमे 5 व 10 किमी अंतरावर असणारे हे गाव असल्याने, इथे अशाप्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण तलाव सुशोभीकरणाचे काम होणे, याला पर्यटनाच्या दृष्टीने चांगले महत्व प्राप्त होणार आहे. कोल्हापूरचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रंकाळा तलावप्रमाणे, शिवपार्वती तलाव देखील पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षण ठरेल असे, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री गिरीश महाजन, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता तौनिक, माजी आमदार चंद्रदीप नरके, नियोजन विभागाचे सचिव राजगोपाल देवरा, पर्यटन सचिव जयश्री भोज, कोल्हापुरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, बांधकाम कार्यकारी अभियंता रोहित तोंडले यांच्या उपस्थितीत शिखर समितीची बैठक पार पडली.

 

या सुशोभीकरणाच्या कामामध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ओपन एअर अँपेथेटर, साधारणतः दीड किमी लांबीचा वॉकिंग ट्रॅक, ओपन एअर जिम एरिया, लॉन्स, सार्वजनिक स्वच्छतागृहे, संरक्षक भिंत, तलावाभोवती सांडपाणी निवारणासाठी गटर्स या आणि अशा अनेक सुविधा शिवपार्वती तलावाच्या कामातून होणार आहेत.

21 फेब्रुवारी 2023 रोजी माजी आमदार नरके यांनी, शिवपार्वती तलावाच्या सुशोभीकरणासाठी प्रस्तावाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते. या मागणीवरून मुख्यमंत्र्यांनी 25 फेब्रुवारी 2023 रोजी पर्यटन सचिवांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. यानंतर पर्यटन विभागाकडून, 23 मे 2023 रोजी जिल्हाधिकारी यांना शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या. यानंतर सदरचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून सादर करण्यात आला. यानंतर 29 जानेवारी 2024 मध्ये हाय पॉवर समितीची तत्कालीन मुख्य सचिव नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावाला मान्यता दिली व सदर प्रस्ताव शिखर समितीकडे पाठवला. यानंतर लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितामुळे शिखर समितीची बैठक होऊ शकली नाही. सदर शिखर समितीची बैठक आज होऊन, शिव-पार्वती तलावाच्या कामासाठी 14 कोटी 98 लाखाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी अंतिम मान्यता दिली.

 

यासाठी माजी आमदार नरके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांचे आभार व्यक्त केले तर सदरच्या कामाच्या मंजुरीच्या कार्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ, मुख्यमंत्री सचिव विकास खार्गे, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, तत्कालिन पर्यटन उपसचिव संजय पोवार, नियोजन विभागाचे सचिव राजगोपाल देवरा, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे आदींचे सहकार्य लाभल्याचे देखील नरके यांनी सांगितले.