कोल्हापूर: यळगुड (ता.हातकणंगले) येथे एका दुकानदाराचा अज्ञात व्यक्तीने गुरुवारी रात्री निर्घृण खून केल्याची घटना घडली. गिरीष पिल्लाई (वय 50, मूळ गाव केरळ, सध्या राहणार विशाल नगर हुपरी ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून हा खून दुकानातच झाला.
जवाहर साखर कारखाना पेट्रोल पंपाजवळ गिरीष पिल्लाई यांचे गेली 25 वर्ष पंक्चर काढण्याचे दुकान आहे. त्यांची पत्नी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. मात्र सहा महिन्यापूर्वी त्यांनी पत्नी व मुलांना आपल्या मूळ गावी केरळमध्ये पाठवलं होतं.
दुकान बंद करून रात्री ते तिथे झोपले होते. रात्री त्यांच्या पत्नीने त्यांना फोन केला असता, त्यांचा संपर्क झाला नाही. त्यामुळे पत्नीने त्यांच्या मित्राला फोन करून याची माहिती दिली. मित्राने गिरीष यांच्या दुकानात जाऊन पाहिले असता. ते रक्ताच्या धारोळ्यात पडल्याचे दिसले. त्यांच्या पोटावर चाकूची आणि डोक्यावर लोखंडी टॉमी ने वार घातल्याचे आढळले. या घटनेचा तपास अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील व पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवी करत आहेत.