कोल्हापूर: काँग्रेस पक्षाच्या वतीने खड्डेमुक्त कोल्हापूरसाठी बुधवार 28 ऑगस्ट रोजी आंदोलन केले जाणार आहे. शहरातील 81 प्रभागाच्या ठिकाणी एकाच वेळी हे आंदोलन केले जाणार आहे. यामध्ये नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून रास्ता रोको केला जाणार नाही.तर रस्त्याच्या दोन्ही बाजूंला निदर्शने केली जाणार आहेत. या आंदोलनात जास्तीत जास्त कोल्हापूरकरांनी आपापल्या प्रभागामध्ये होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या बैठकीत रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत चर्चा झाली. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या या बैठकीला काँग्रेसचे सर्व माजी नगरसेवक व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. रस्त्यावर पडलेल्या मोठ-मोठ्या खड्डयातून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे अनेकदा लहान-मोठे अपघात होत आहेत. गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. खड्डेमय रस्त्याबाबत कोल्हापूरकरांमध्ये मोठा असंतोष असून 28 ऑगस्ट रोजी आंदोलनाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार शहरातील 81 प्रभागांमध्ये बुधवारी सकाळी ९ वाजता एकाच वेळी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, रस्त्यांच्या दुर्दशेमुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरील खड्डे मुजविण्यासाठी महापालिकेकडे वारंवार मागणी केली आहे. यावर तत्काळ कार्यवाही होत नसल्याने हे जन आंदोलन करण्यात येत आहे.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, महाराष्ट्र प्रदेश औद्योगिक सेलचे सचिव सत्यजित जाधव, माजी उपमहापौर भूपाल शेटे, राजू लाटकर यांच्यासह काँग्रेसचे माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.