मुंबई :विधानसभा निवडणूक जवळ येईल तसे महाविकास आघाडी आणि महायुतीकडूनही उमेदवारांची चर्चा सुरु आहे. भारतीय जनता पक्षाला एक मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरु आहे. भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, या चर्चा हर्षवर्धन पाटील यांनी फेटाळून लावल्या आहेत.
हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतली . या भेटीत काही राजकीय चर्चा झाल्या. त्यामुळे हर्षवर्धन पाटील खरंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात येणार असल्याच्या चर्चा रंगु लागल्या आहेत. दरम्यान, हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्या भेटीवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणुकीच्या काळात काहीजण इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे येतात. मात्र, हर्षवर्धन पाटील आमच्याबरोबरच राहतील असा विश्वास आहे”, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.