२७ ऑगस्टला युवाशक्ती दहीहंडीचा कोल्हापुरात थरार रंगणार, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि लोकप्रिय युवाशक्ती दहीहंडीसाठी प्रथम क्रमांकाला ३ लाख रूपयांचे बक्षीस

कोल्हापूर :यावर्षी पुन्हा एकदा कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात, धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपच्यावतीने दहीहंडीचा थरार आणि जल्लोष रंगणार आहे. यावर्षी मंगळवार दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेला प्रारंभ होईल. पश्चिम-दक्षिण महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि गाजलेल्या युवाशक्तीच्या दहीहंडी स्पर्धेतील ३ लाख रूपयांचे बक्षिस

पटकावण्यासाठी, यंदाही गोविंदा पथकांची चुरस रंगणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटनाला राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण दिले जाईल. स्पर्धेमधील विजेत्या गोविंदा संघाला रोख ३ लाख रूपयांचे पारितोषिक दिले जाईल. शिवाय युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेत सहभागी होणार्‍या प्रत्येक गोविंदा पथकाला, प्रोत्साहन देण्यासाठी अन्य बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. पहिल्याच प्रयत्नात सहा थर रचून सलामी देणार्‍या गोविंदा पथकाला ५ हजार रूपये, तर सात थर रचून सलामी देणार्‍या गोविंदा पथकाला १० हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच सर्वात वरच्या थरावर चढून, दहीहंडी फोडणार्‍या गोविंदाच्या सुरक्षेेसाठी, दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी विशेष उपाय योजना करण्यात आली आहे. त्यासाठी समीट अ‍ॅडव्हेंचरचे विनोद काम्बोज आणि हिल रायडर अ‍ॅडव्हेंचर फौंडेशनचे प्रमोद पाटील यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. शिवाय एखादा गोविंदा जखमी झाल्यास, त्याच्यावर तत्परतेने उपचार करण्यासाठी समीट अ‍ॅडव्हेंचरचे आणि हिल रायडर अ‍ॅडव्हेंचरचे कार्यकर्ते सज्ज असतील. त्याचप्रमाणे सीपीआर आणि सिद्धगिरी हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकांसह डॉक्टरांचे पथक सज्ज असेल. दहीहंडी फोडणारा सर्वात वरच्या थरावरील गोविंदा १४ वर्षावरील असावा, या नियमाचे काटेकोर पालन केले जाईल. तर प्रारंभी श्रीमंत ढोलताशा पथक आणि सागर बगाडे यांच्या सार्थक क्रिएशनचा सांस्कृतिक कार्यक्राम होईल. शासनाने दहीहंडी खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. त्यानुसार सर्व नियमांचे पालन करून, स्पर्धेचे आयोजन होणार आहे.

युवाशक्ती दहीहंडीचे प्रायोजक वरदविनायक पार्क इन्फ्रा प्रायव्हेट लिमिडेट हे आहेत. दरवर्षीप्रमाणे कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक मैदानावर, युवाशक्ती दहीहंडीसाठी शिस्तबध्द नियोजन करण्यात आलेे आहे. डिजे रणजितसह, उत्तम ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था, निमंत्रित मान्यवरांसाठी भव्य व्यासपीठ, महिला आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असणार आहे. शिवाय संपूर्ण दहीहंडी सोहळ्याचे चॅनल बी वरून थेट प्रक्षेपण होईल. युवाशक्ती दहीहंडीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी युवाशक्ती दहीहंडीच्या तयारी आणि नियोजनासाठी आढावा बैठक घेतली असून, युवाशक्तीचे सुमारे दोनशे कार्यकर्ते दहीहंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दहीहंडीचा आनंद आणि थरार अनुभवण्यासाठी कोल्हापूर वासियांनी २७ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता दसरा चौकात उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला दहीहंडी संयोजन समिती उत्तम पाटील, इंद्रजित जाधव, राजेंद्र बनसोडे, विजय टिपुगडे, सागर बगाडे, झाकीर जमादार, उदय चव्हाण, अनंत यादव, विनायक सुतार, डीजे रणजित, जय श्रीराम ध्वज हलगी पथक कागल, महेश कांबळे उपस्थित होते.