कोल्हापूर – – संपूर्ण देशात कोलकाता तर राज्यात बदलापूर अत्याचाराची घटना चर्चेत असताना आता कोल्हापूर देखील असाच एका घटनेने हादरुन गेले आहे. काल (गुरुवारी) सकाळी शिये गावातील ओढ्याजवळच्या ऊसाच्या शेतात एका दहा वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला होता. या मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. अखेर पोलीस तपासात देखील हा संशय खरा ठरला आहे. जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडीत यांनी पत्रकार परिषदेत मृत मुलीवर नातेवाईक असलेल्या दिनेश कुमार साह यांने अत्याचार केल्याचे सांगितले.
पीडित मुलगी शिये परिसरात राहणाऱ्या मजूर कुटुंबातील रहिवासी आहे. आई-वडील कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर ती भावंडांसोबत घरी असायची. बुधवारी आई-वडील कामाला बाहेर गेल्यानंतर पीडित मुलगी आणि तिच्या भावंडांसह संशयित आरोपी दिनेशकुमार देखील घरी होता. बुधवारी संध्याकाळी पीडित मुलीचे आई-वडील घरी आल्यावर दिनेशकुमारला मुलीबद्दल विचारले, यावर त्याने ती दुपारीच बाहेर गेल्याचे सांगितले. त्यानंतर काळजीग्रस्त पालकांनी पोलिसांत धाव घेत शिरोली एमआयडीसी पोलिसांत अपहरणाची तक्रार दिली. त्यानंतर काल (गुरुवारी) सकाळी शिरोली एमआयडीसी पोलिसांनी श्वान पथकासह तपास सुरु केला. श्वानाने दाखवलेल्या मागानुसार पोलीस मृतदेहापर्यंत पोहचले.
त्या ठिकाणी अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी पीडित मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास करत सहा संशयितांना ताब्यात घेतले. यातील पीडित मुलीचा नातेवाईक असलेल्या दिनेशकुमारने अखेर पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार करून गळा आवळून लाथा बुक्क्यानी मारहाण करुन निर्दयीपणे तिचा खून केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
याप्रकरणी आरोपी दिनेशकुमारवर बलात्कार, खून आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी काल (गुरुवारी) रात्री पत्रकार परिषदेत सांगितले.