मुंबई: बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत १३ ऑगस्ट रोजी दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला होता. त्यानंतर संतापलेल्या पालकांनी आज बदलापूर रेल्वे स्थानक आणि आदर्श शाळेच्या बाहेर आंदोलन सुरू केले. तीन तासांहून अधिक काळ सुरू असलेले हे आंदोलन आता चिघळले असून आंदोलकांनी शाळेत घुसून तोडफोड केली आहे. तर रेल्वे स्थानकावर असलेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. यामध्ये काही नागरिक जखमी झाल्याचे दिसून आले.
तीन तासांहून अधिक काळ मध्य रेल्वे सेवा ठप्प झाल्यामुळे हतबल झालेल्या पोलिसांनी आंदोलकांना रेल्वे ट्रॅकवरून बाजूला करण्यासाठी बळाचा वापर करण्याची भाषा केली. तसेच आंदोलकांच्या दिशेने मोर्चा करायला सुरुवात केली होती. पोलिसांना आपल्या दिशेने येताना पाहून आंदोलक खवळले आणि त्यांनी ट्रॅकवरील दगड उचलून पोलिसांच्या दिशेने फेकायला सुरूवात केली. त्यामुळे पोलिसांनी माघार घेत बळाचा वापर न करण्याचा निर्णय घेतला.
सध्या संतप्त आंदोलकांना समजविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. मात्र महिला आंदोलक आणि इतर आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आरोपीला तात्काळ फाशी द्यावी, अन्यथा आमच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी आंदोलक करत आहेत. पोलीस कायदेशीर प्रक्रियेबाबत महिला आंदोलकांची समजूत घालत आहेत. मात्र अद्याप कोणताही तोडगा निघाला नसल्याचे दिसत आहे.