कोल्हापूरचा समृद्ध- नैसर्गिक आणि ऐतिहासिक वारसा छायाचित्रणाच्या माध्यमातून जतन करण्याचे काम पिढ्यानपिढ्या होत असल्याचे समाधान: खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूरची निसर्ग संपदा, इथली समृद्ध परंपरा आणि कोल्हापूरचा ऐतिहासिक ठेवा छायाचित्रणाच्या माध्यमातून जतन करण्याचं महत्त्वपूर्ण काम, छायाचित्रकारांच्या अनेक पिढ्यांनी केलंय. त्यामुळंच नव्या पिढीला आणि संपूर्ण जगाला कोल्हापूरचा गौरवशाली वारसा कळून येतो, असे उद्गार खासदार धनंजय महाडिक यांनी काढले. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन, कोल्हापूर क्रियेटर्स, कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या छायाचित्रण प्रदर्शन आणि स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.

जागतिक छायाचित्रण दिनाचं औचित्य साधून, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन, कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन आणि कोल्हापूर क्रिएटर्स ग्रुपच्यावतीनं, शाहू स्मारक भवनच्या हॉलमध्ये छायाचित्र प्रदर्शन आणि स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये सुमारे ६०० छायाचित्रांचा समावेश होता. मोबाईल आणि कॅमेर्‍यातून काढलेल्या छायाचित्रांच्या या प्रदर्शनाला अनेक कलाप्रेमींनी आवर्जुन भेट दिली. या स्पर्धेचा निकाल आज जाहीर झाला. तत्पूर्वी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांच्या उपस्थितीत, कॅमेर्‍याचं पूजन करण्यात आलं. फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत मनोळे यांनी या कार्यक्रमाची पार्श्‍वभूमी विषद केली. हजारो लिखित ओळी व्यक्त होणार नाहीत, त्या भावना एका छायाचित्राच्या माध्यमातून व्यक्त होतात. कोल्हापुरातील अनेक पिढ्यांतील छायाचित्रकारांनी, कोल्हापूरचा समृध्द निसर्ग आणि ऐतिहासिक वारसा, छायाचित्रांच्या माध्यमातून टिपलाय. हा वारसा अनेक पिढ्यांना उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. रोटरी क्लबच्या माध्यमातून पुढील वर्षीही भव्य स्वरूपात प्रदर्शन आयोजित केलं जाईल, असा विश्‍वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. युवाशक्तीची दहीहंडी जशी पश्‍चिम महाराष्ट्रात प्रसिध्द आहे, त्याचप्रमाणं हे छायाचित्र प्रदर्शन आणि स्पर्धा प्रसिध्द होतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. यानंतर हरित चळवळ चालवणार्‍या ग्रीन वळीवडे ग्रामस्थांना, सेवा निलयम संस्था, जीवरक्षक दिनकर कांबळे, चेतना अपंगमती विकास संस्थेचे पवन खेबुडकर, मर्दानी खेळ विशारद वस्ताद पंडित पवार आणि सातार्‍याचे दिव्यांग छायाचित्रकार अविनाश कुलकर्णी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मोबाईल फोन गटात युवराज पाटील प्रथम, श्रीकांत हर्डीकर द्वितीय, ऋतुराज जाधव तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले. तर कॅमेरा गटात सुदर्शन वंदकर, नाना तोडकर, उत्कर्ष पाटील विजेते ठरले. कॅमेरा संस्था गटात, हर्षदा लांजेकर, महेश सुतार, वैभव घाटगे, प्रतिक देठे, अनिकेत गुरव या विजेत्यांचा खासदार धनंजय महाडिक, सौ. अरूंधती महाडिक, बी एस शिंपुगडे, संजय जोशी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं देवून सत्कार झाला. यावेळी किशोर पालोजी, विनोद चव्हाण, सचिन लाड, प्रकाश क्षीरसागर, विजय टिपुगडे यांच्यासह कोल्हापुरातील छायाचित्रकार उपस्थित होते.