शहाजी महाविद्यालयात झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरी

कोल्हापूर प्रतिनिधी : संग्राम पाटील

पर्यावरण वाचले तर आपण उद्या वाचणार आहोत.हवा, पाणी, जमीन प्रदूषणावर वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन हाच उपाय आहे.येणारा रक्षाबंधन सण देखील पर्यावरण पूरक साजरा करा,प्रत्येकाने झाडे लावा आणि त्याचे जतन करा असे आवाहन बिद्री येथील दुग्ध शर्करा महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ.क्रांती बी. पाटील यांनी केले. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील पर्यावरण पूरक रक्षाबंधन या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.के.शानेदिवाण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.

श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने आज (शनिवारी) महाविद्यालय परिसरातील झाडांना राख्या बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. तसेच बियांपासून केलेल्या पर्यावरण पूरक राख्यांचे वाटप यावेळी करण्यात आले.
डॉ. क्रांती पाटील म्हणाल्या, भूसंखलन, क्षारपड जमिनीचे प्रश्न, महापूर, हवा, पाणी प्रदूषण या समस्या माणसांमुळेच निर्माण झालेल्या आहेत. माणसाच्या हव्यासाने वृक्षतोड झाली. निसर्गावर अतिक्रमण झाली. यामुळे या समस्या वाढल्या आहेत. यामुळे मानवी जीवनास धोका निर्माण झालेला आहे. कॅन्सर सारखे रोग वाढत आहेत. यावर उपाय म्हणून सर्वांनी वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन करावे तसेच नैसर्गिक पूरक जीवन जगावे.
प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण म्हणाले, शहाजी महाविद्यालयाला पर्यावरण पूरक रक्षाबंधनाची आणि पर्यावरण पूरक दसरा साजरा करण्याची परंपरा आहे. विद्यार्थ्यांनी वर्गातील ज्ञानाबरोबरच वर्गाबाहेरही निसर्ग पूरक शिक्षणाचे धडे घ्यावेत. वृक्ष संवर्धन आणि वृक्षारोपणास विद्यार्थ्यांनी हातभार लावावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. स्वागत व प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. ए. व्ही. मगदूम पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एस बी चव्हाण यांनी केले. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक यांनी मनोगत व्यक्त केली. वैभवी घाग यांनी आभार मानले. विज्ञान विभागाच्या समन्वयक प्रा. पी. एस. कुलकर्णी, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील, प्राध्यापक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे या उपक्रमास प्रोत्साहन मिळाले.
प्रा. श्रद्धा महाले, प्रा. संतोष जगताप, प्रा. मनोज कांबळे, प्रा तुषार कांबळे यांनी संयोजन केले.

🤙 8080365706