राहुल गांधी यांच्याकडे ‘ब्रिटिश नागरिकत्व’ असल्याचा दावा; भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी 

दिल्ली: भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी केली असून, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

 

राहुल गांधी यांच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आणि ब्रिटिश पासपोर्ट असल्याचा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला. या प्रकरणी न्यायालयाने केंद्र सरकारकडून स्टेटस रिपोर्ट मागवावा अशी मागणी त्यांनी केली आहे. याचिकेत सुब्रमण्यम स्वामी म्हणतात की, पाच वर्षांपूर्वी राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत गृहमंत्रालयाकडे तक्रार केली होती. अद्याप गृहमंत्रालयाने या मुद्द्यावर काय निर्णय किंवा कारवाई केली हे स्पष्ट केलं नाही.
सुब्रमण्यम यांनी गृहमंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की युनायटेड किंगडम मध्ये 2003 साली बॅकअप लिमेटेड नावाची कंपनी नोंदणीकृत झाली होती, त्या कंपनीत राहुल गांधी संचालक आणि सचिव होते. 2005 आणि 2006 मध्ये दाखल केलेल्या कंपनीच्या वार्षिक रिटर्न मध्ये राहुल गांधींचे राष्ट्रीयत्व ब्रिटिश असल्याचे नमूद करण्यात आले होते.असा आरोप त्यांनी केला.