पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदके जिंकून इतिहास. रचणारी नेमबाज मनू भाकेर हिच्यावर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने मोठी जबाबदारी सोपवली आहे.पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतासाठी दोन कांस्यपदकं जिंकत नेमबाज मनू भाकेरने इतिहास घडवला आहे. मनूने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तुलमध्ये कांस्यपदक जिंकून भारताचे खाते उघडले. अशाप्रकारे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय नेमबाज ठरली. त्यानंतर त्याने सरबज्योत सिंगसोबत 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये मिश्र सांघिक कांस्यपदकही पटकावले. तर २५ मी एअर पिस्तूल स्पर्धेत मनू तिसरे पदक जिंकण्यापासून थोडी दूर राहिली आणि चौथ्या क्रमांक पटकावला. तिच्या कामगिरीसह मनूवर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने मोठी जबाबदारी सोपवली आहे.मनू भाकेर येत्या रविवारी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या समारोप समारंभात भारताची ध्वजवाहक असेल. फ्रान्सच्या राजधानीत ११ ऑगस्ट रोजी समारोप सोहळा होणार आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) अधिकाऱ्याने सांगितले की, ध्वजवाहक म्हणून मनूची निवड करण्यात आली आहे. तिने उत्कृष्ट कामगिरी केली आणि ती यासाठी पात्र आहे. यापूर्वी मनूने म्हटले होते की भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत जे अधिक पात्र आहेत परंतु मला ही संधी दिली हा खरा सन्मान असेल. IOA ने अद्याप पुरूष ध्वज धारकाची घोषणा केलेली नाही. २६ जुलै रोजी झालेल्या उद्घाटन समारंभात टेबल टेनिस खेळाडू शरथ कमल पुरुष ध्वजवाहक आणि पीव्ही सिंधू महिला ध्वजवाहक होत्या.