राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळ्यात मनुस्मृतीचे दहन केले. यावेळी त्यांच्याकडून अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना झाली. यामुळे राज्यभर भाजपाकडून आव्हाडांचा निषेध केला जात आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी आव्हाडांविरोधात आंदोलन केलं. त्याचबरोबर पुण्यातील एका पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. भाजपाकडून आव्हाडांवर टीका होत असताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ हे आव्हाडांचा बचाव करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. तसेच शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील श्लोकांचा समावेश करू पाहणाऱ्या शिक्षण विभागावर आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांवर टीका केली आहे.
शिक्षण विभागाने शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे दोन श्लोक समाविष्ट करण्याचा प्रस्ताव ठेवला असून त्याबाबत सूचना आणि आक्षेप मागवले आहेत. त्याविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त करत मनुस्मृती दहन करण्याचा कार्यक्रम राबवला. परंतु, यावेळी मनुसमृतीची प्रत फाडत असताना त्यांच्या हातून अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेला कागद फाटला. चवदार तळे परिसरातील गोंधळ, कार्यकर्त्यांची गर्दी आणि मनुस्मृतीविरोधातील रागाच्या भरात गडबडीत त्यांच्याकडून ही चूक झाली. याबाबत त्यांनी त्याच ठिकाणी माफीदेखील मागितली. मात्र या घटनेमुळे आव्हाडांवर टीका होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून अनेक नेत्यांनी आव्हाडांवर टीका केली.
यावेळी छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांची बाजू मांडली आहे.“जितेंद्र आव्हाड हे खूप चांगल्या भावनेने तिथे गेले होते. तिथे त्यांच्या हातून चुकून काहीतरी झालं. तो कागद फाडताना त्यांनी त्यावर कोणाचा फोटो आहे ते पाहिलं नव्हतं. त्याप्रकरणी त्यांनी जाहीर माफीदेखील मागितली आहे. त्यामुळे आव्हाडांवर टीका करत बसण्यापेक्षा आपण त्यांची भावना लक्षात घेतली पाहिजे. ते विरोधी पक्षातील नेते असले तरी त्यांच्यावर टीका करण्यात अर्थ नाही. मुळ मुद्द्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आमचं म्हणणं इतकंच आहे की, आपल्या शालेय शिक्षणात ममुस्मृतीचा चंचूप्रवेश नको.”छगन भुजबळ म्हणाले.