पन्हाळा तालुक्यातील यवलुज येथील कुंपण घालून केलेल्या अतिक्रमणामुळे धनगर गल्लीतील सांडपाणी रस्त्यावर आले आहे, त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा येत असल्याने, नागरिकात संताप व्यक्त होत आहे. हे अतिक्रमण त्वरित हटवा या मागणीचे निवेदन येथील नागरिकांनी पन्हाळा तहसिलदांना दिले आहे.
पन्हाळा तालुक्यातील यवलुज येथील रहिवासी महिपती चिले यांनी राहत्या घराला कुंपण घालून अतिक्रमण केले आहे. यामुळे धनगर गल्लीतील सांडपाण्याचा मार्ग बदलला आहे. ते सांडपाणी साचून रस्त्यावर आल्याने गावातील लोकांना रस्त्यावरून ये- जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. या सांडपाण्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे रोगाराई पसरण्याची भीती नागरिकांत निर्माण झाली आहे. याच सांडपाण्यामुळे झालेल्या चिखलात दुचाकींचे घसरून अपघातही झालेले आहेत. या सांडपाण्याला मार्ग करण्यासाठी गावात गटारीचे काम करून देणे व अतिक्रम हटवण्याची मागणी केली आहे. सुभाष देवेकर, दगडू देवेकर, बाजीराव पाटील यांनी या मागणीचे निवेदन पन्हाळा तहसीलदारांकडे दिले. तसेच पन्हाळा गट विकास अधिकारी यांनाही निवेदन दिले आहे. कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.