इरिगेशन फेडरेशन आणि हजारो शेतकऱ्यांच्या वतीने पंचगंगा पुलावर आंदोलन

शासकीय पाणीपट्टीत केलेली भरमसाट दरवाढ, जलमापक मीटरच्या केलेल्या सक्तीविरोधात महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन व श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने आज, बुधवारी सकाळी अकरा वाजता पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला जाणार होता. मात्र पोलीस प्रशासन आणि शेतकरी यांच्या मध्ये चर्चा होऊन पंचगंगा पुलाजवळ शेतकरी आणि फेडरेशन यांचा मेळावा घेतला गेला. याबाबत, जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत आंदोलन न करण्याचे आवाहन केले होते, पण संघटनांचे पदाधिकारी ठाम राहिले होते मात्र नंतर समजूतपणा घेण्यात आला.

शासकीय पाणीपट्टी दरवाढ रद्द करा, राज्य शासनाचा पाटबंधारे विभाग जोपर्यंत घनमीटर पद्धतीने पाणी वाटप करत नाही, तोपर्यंत जलमापक मीटरची सक्ती नको, शासनाच्या योजनांवर ज्याप्रमाणे ८१ टक्के वीजबिल शासन भरते आणि १९ टक्के शेतकरी त्याप्रमाणे सहकारी पाणीपुरवठा संस्थांची आकारणी व्हावी, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनने राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. पण, शासनाने दखल न घेतल्याने रास्ता रोको करण्याचा निर्णय इरिगेशन फेडरेशनने घेतला होता. आंदोलनाच्या ठिकाणी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी येऊन संबंधित शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन स्वीकारले.

यावेळी आ. अरुण लाड, भारत पाटणकर, आ. सतेज पाटील, संजय बाबा घाडगे इत्यादी उपस्थित होते. आंदोलनाच्या ठिकाणी कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील हजारोच्या संख्येने शेतकरी जमा झाल्याने महामार्गावर पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. यावेळी मोठ्या पोलीस फौज फाट्यासह वरिष्ठ अधिकारी हजर होते.

🤙 9921334545