मोदींनी मुक्काम केलेल्या हॉटेलचं बिल अद्याप थकित

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वर्षी म्हैसूर दौऱ्यावर होते. त्यावेळी मोदींचा मुक्काम असलेल्या हॉटेलचं बिल अद्याप भरण्यात आलेलं नाही. त्यावरुन आता हॉटेलनं कायदेशीर कारवाईची धमकी दिली आहे. एप्रिल २०२३ मध्ये मोदी म्हैसूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी मुक्काम केलेल्या हॉटेलचं ८०.६ लाख रुपयांचं बिल अद्याप भरलं गेलेलं नाही.

राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण आणि पर्यावरण हवामान बदल मंत्रालय यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे झाल्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हैसूरला आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी मोदींचा मुक्काम रेडिसन ब्ल्यू प्लाझामध्ये होता. याच हॉटेलचं बिल अद्याप भरण्यात आलं नसल्याची माहिती समोर आली आहे.

राज्य वन विभागाला ९ ते ११ एप्रिल दरम्यान कार्यक्रमाचं आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यासाठीचं बजेट ३ कोटी रुपये होतं. वन विभागाला १०० टक्के केंद्रीय सहाय्य देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. पर्यावरण आणि वन मंत्रालय आणि एनटीसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेवरुन अतिशय अल्पकाळात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. त्यासाठी ६.३३ कोटी रुपयांचा खर्च आला.

सगळ्या घडामोडी सुरु असताना रेडिसन ब्ल्यू प्लाझाच्या महाव्यवस्थापकांनी २१ मे २०२४ रोजी उपवनसंरक्षक बसवराजू यांना पत्र लिहिलं. आमच्या हॉटेलच्या सेवा वापरुन १२ महिने उलटून गेल्यानंतरही बिल भरण्यात आलेलं नाही, याची आठवण त्यांनी करुन दिली. अनेकदा आठवण करुन देऊनही बिलाची रक्कम न भरल्यानं आता १८ टक्के प्रतिवर्ष व्याज दरानं पैसे भरा. व्याज म्हणून १२.०९ लाख रुपये अधिकचे भरा, असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. १ जून २०२४ पर्यंत बिल न भरल्यास हॉटेल व्यवस्थापन कायदेशीर कारवाई, असा इशारा त्यांनी दिला आहे.