कोल्हापूरचे शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांना मिळणार ‘शॉ’ पुरस्कार

भारतीय वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांना २०२४ सालच्या खगोलशास्त्रातील शॉ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅल्टेक) येथील प्राध्यापक असलेल्या कुलकर्णी यांना वेगवेगळ्या खगोलीय घटनांचा अभ्यास करण्याच्या क्षेत्रात केलेल्या क्रांतिकारी संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

कुलकर्णी यांनी मिलीसेकंद पल्सर, गामा-रे बर्स्ट, सुपरनोव्हा यासारख्या अनेक अल्पायुषी खगोलीय घटनांचा अभ्यास केला आहे. त्यांनी पॅलोमर ट्रान्झिएंट फॅक्टरी आणि त्याची पुढची पिढी असलेल्या झविकी ट्रान्झिएंट फॅक्टरी या आधुनिक वेधशाळांच्या निर्मिती आणि कारभारात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या संशोधनामुळे आपल्याला आकाशातील वेळानुसार बदलणाऱ्या प्रकाशाची अधिक चांगली समज येण्यास मदत झाली आहे.

विशेष बाब म्हणजे डॉ.कुलकर्णी यांचा जन्म महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्याचा आहे. कुलकर्णी यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्थान (IIT) मधून १९७८ मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर १९८३ मध्ये अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातून पीएच.डी. ची पदवी मिळविली. २००६ ते २०१८ या काळात ते कॅल्टेक ऑप्टिकल ऑब्झर्व्हटरीजचे संचालक होते.

हाँगकाँगचे दिवंगत उद्योगपती रन रन शॉ यांनी स्थापन केलेल्या शॉ पुरस्कारामध्ये दरवर्षी खगोलशास्त्र, जीवनशास्त्र आणि वैद्यकशास्त्र तसेच गणितशास्त्र अशा तीन क्षेत्रातील सर्वोत्तम संशोधनांना प्रत्येकी १.२ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतके रोख पारितोषिक दिले जाते. यावर्षी श्रीनिवास कुलकर्णी यांच्यासोबत अमेरिकेच्या स्वी ले थेन आणि स्टुअर्ट ऑर्किन यांना जीवनशास्त्र आणि वैद्यकशास्त्रातील, तर पीटर सरनक या अमेरिकन शास्त्रज्ञाला गणितशास्त्रातील शॉ पुरस्कार देण्यात आला आहे. २१ व्या शॉ पुरस्कार समारंभ १२ नोव्हेंबर २०२४ रोजी हाँगकाँगमध्ये होणार आहे. या समारंभात या तीनही क्षेत्रातील नामवंत शास्त्रज्ञांच्या योगदानाचा गौरव केला जाणार आहे.

🤙 9921334545