बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला झाला. म्हणून या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असे म्हणतात. आज गौतम बुद्धांची 2586 वी जयंती साजरी केली जात आहे. भगवान बुद्धांना भगवान विष्णूंचा शेवटचा आणि 9वा अवतार मानलं जातं.
जगभरात बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. चीन, जपान, श्रीलंका, दक्षिण कोरिया, बर्मा, थायलंड ही बौद्ध राष्ट्रे आहेत. त्यापैकी थायलंडमधल्या बँकॉकचे ‘वाट ट्रेमिट’ हे बौद्ध विहार ‘गोल्डन बुद्धा’या नावाने ओळखलं जातं. अतिशय भव्य-दिव्य आणि तितकीच सुंदर या विहाराची रचना आहे. नावाप्रमाणेच या विहारात गौतम बुद्धांची सुवर्ण मूर्ती आहे.
गौतम बुद्धांच्या या विहारातील मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर, त्यांच्या शांती आणि संयमाच्या शिकवणीची प्रचिती आपोआप येते. गोल्डन बुद्धा म्हणून ओळख असलेल्या मूर्तीची खास वैशिष्ट्ये आहेत. गौतम बुद्धांची ही जगातील सर्वात मोठी सोन्याची मूर्ती आहे. या मूर्तीचं वजन तब्बल 5,500 किलो इतकं आहे. विकाऊ नसली तरी बाजारभावानुसार, तब्बल 19 अब्ज इतकी मूर्तीची किंमत सांगितली जाते. ही मूर्ती 9.8 फूट उंचीची आहे. ही अतिप्राचिन मूर्ती असून अनेक वर्ष जगापासून ही मूर्ती सोन्याची आहे, ही बाब लपून होती.
ही मूर्ती नेमकी कधी तयार करण्यात आली याबद्दल ठोस पुरावे नाहीत. पण काही अभ्यासकांच्या अंदाजाने 13व्या ते 14व्या शतकात सुखोथाई राजवंशाच्या शैलीत ही मूर्ती तयार झाली. 1767 दरम्यान म्यानमारमधून थायलंडवर आक्रमण केलं जात होतं. या आक्रमणांपासून मूर्तीचं संरक्षण व्हावं आणि मूर्ती पळवून नेली जाऊ नये, म्हणून त्यावर प्लास्टर लावण्यात आलं. काही वर्षांनंतर 1954 साली, बँकॉकमधील नवीन बांधण्यात आलेल्या बौद्ध विहारात ही मूर्ती हलवण्यात येत असताना ती पडली आणि या मूर्तीचं खरं वास्तव जगासमोर आलं.