बालिंगा पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी अशक्य

दोनवडे : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगा येथील नवीन पुलाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. सध्या पुलाच्या पाईप फाउंडेशनचे काम सुरू आहे. पाया खोदाई व कॉंक्रिटीकरण सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी केवळ पंधरा दिवसांत काम पूर्ण होणे अशक्य आहे. रस्ता व पुलाचे बांधकाम एकाच वेळी करण्याची मुदत दिली होती. पण कॉन्ट्रॅक्टरना वेळेत काम करण्याचे आश्वासन पाळता आलेले नाही. मुख्यत्वे बालिंगा येथील रिव्ह्ज पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याशिवाय पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता काँक्रीटीकरण काम करता येणार नाही.

बालिंगा येथील रिव्हज पुलाचे काम व्ही. पी. शेट्टी कन्स्ट्रक्शन (जालना) या कंपनीने घेतले आहे. वर्षभरात मे २०२४ पर्यंत काम करण्याची मुदत देण्यात आली होती. लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी मोठ्या शर्थीने प्रयत्न सुरू आहेत. मुंबई येथील क्षेत्रीय कार्यालयात सदर कामाची मुदतवाढ करण्याची मागणी कंपनीने केली आहे. गेल्या पावसाळ्यात २०२३ च्या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पोलीस प्रशासनाने व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बालिंगा येथील भोगावती रिव्हज पुलाला धोका असल्याने दोनवडे ते बालिंगा दरम्यानची वाहतूक पूर्णतः बंद केली होती. लोकांना पायी चालत जाण्यासही मज्जाव करण्यात आला होता. वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवली होती. मात्र नेमका काय धोका आहे हे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले नव्हते.

पावसाळ्यात भोगावती रिव्हज पूल ते दोनवडे दरम्यान रस्त्यावर पाणी येते आणि जवळपास २५ गावांना पुराचा धोका निर्माण होतो. वर्षात काम होईल असे आश्वासन नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी दहा गावच्या सरपंच शिष्टमंडळाला दिले होते. पण काम अद्याप सुरूच आहे. सध्या काम युद्धपातळीवर सुरू असले तरी पुलाचे काम अद्याप ४० टक्के सुद्धा झालेले नाही.

कोल्हापूर गगनबावडा मार्गावर कळे येथील काँक्रीटीकरणाचे काम अपूर्ण आहे. दोनवडे पर्यंत दोन्ही बाजूचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. दोनवडे ते फुलेवाडी नाका दरम्यानचे काम अपूर्ण आहे. बालिंगा येथील नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच पूर्वेकडील व पश्चिमेकडील रस्त्याचे काम होणार आहे. पुलाच्या उंचीच्या प्रमाणावर दोन्ही बाजूला किती भराव येणार ते ठरणार आहे.