मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसचा जाहीरनामा माओवादी जाहीरनामा आहे असे म्हणत काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर यावेळी त्यांनी सडकून टीका केली. मंदिरातील सोने आणि महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्राचे सोने या दोन्हीवर काँग्रेसचा डोळा आहे असे मोदी म्हणाले.
अयोध्येतील राममंदिर आणि जम्मू काश्मीरमधून ३७० कलम काढून टाकले हे अशक्य असं काम आम्ही केलं. हे शक्य झालं ते केवळ बहुमत मिळाल्यामुळे आणि मोदींमुळे, असं इतर नेत्यांनी यावेळी भाषणांमधून नमूद केलं.गेल्या दहा वर्षात मुंबईकरांना आता जास्त सुरक्षित वाटत आहे. भूतकाळात जसे हल्ले दहशतवादी घटना मुंबईत घडत होत्या त्या आता बंद झाल्या असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
यावेळी तिथे महायुतीच्या सर्व नेत्यांनी उपस्थिती लावली होती. या सभेत राज ठाकरेंमुळे सर्वांच विशेष लक्ष लागलेलं होतं. तर दुसर्या बाजूला महाविकास आघाडीनेही त्यांची प्रचारसभा आयोजित केली होती. मुंबईतील बीकेसी मैदानावर ही सभा झाली.ज्यात शिवसेना (उबाठा) नेते उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आप नेते अरविंद केजरीवाल उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतीय लोकशाही संपवायची असून ते देशाला हुकूमशाहीकडे घेऊन जात असल्याचा आरोप केजरीवाल यांनी त्यांच्या भाषणात केला. रोजगार निर्मिती आणि महागाई नियंत्रणात मोदी लक्ष देत नसल्याचा दावा त्यांच्या भाषणात खरगे यांनी केला.
यावेळी शरद पवार म्हणाले की, शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी मोदींना त्यांच्या कठीण काळात मदत केली हे महाराष्ट्राला ठाऊक आहे, पण आता पंतप्रधानांना त्याचा विसर पडला आहे. उद्धव ठाकरेंनीही त्यांच्या भाषणात पंतप्रधान मोदींवर टीका केली. ते म्हणाले, “तुम्ही ज्या पद्धतीने नोटाबंदीची घोषणा केली, त्याप्रमाणे ४ जूनला देश तुमच्यावर बंदी करेल. तुम्ही फक्त नरेंद्र मोदी म्हणून राहाल, भारताचे पंतप्रधान म्हणून नाही,” असे ठाकरे म्हणाले.