लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगजेबाच्या जन्मस्थानाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगरमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगजेबाच्या जन्मस्थानाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाषणात एकरी उल्लेख केल्याप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल काजळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा निवडणूक शाखेकडून राऊत यांच्यावर कारवाईबाबत कोतवाली पोलिसांना प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौथ्या टप्प्यात नगर-दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली. त्यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी स्वत: संजय राऊत मैदानात उतरले होते. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ अहमदनगर शहरातील क्लेराब्रूस मैदानावर 8 मे रोजी सायंकाळी सभा झाली होती. या सभेत ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी औरंगजेबाच्या जन्मस्थळाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यावेळी त्यांनी मोदी यांचा एकरी उल्लेख केला होता.
महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या सभेत बोलताना संजय राऊत यांनी औरंगजेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म एकाच गावात झाला होता, असा दावा केला होता. एका औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडलं तर तू कोण? असा पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख संजय राऊत यांनी केला होता.
