अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळाला ठाणे मतदारसंघ

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात महायुतीमध्ये काही जागांवरुन घोडं अडलं होतं. यामध्ये ठाणे  मतदारसंघाचाही समावेश होता. भाजपाने ठाणे मतदारसंघ मिळावा यासाठी आग्रही होतं. पण अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला  हा मतदारसंघ मिळाला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात महायुतीमध्ये काही जागांवरुन चांगलीच रस्सीखेच सुरु होती. यामध्ये  ठाणे मतदारसंघाचाही समावेश होता. एकीकडे एकनाथ शिंदेंची शिवसेना मतदारसंघावर दावा करत असताना दुसरीकडे भाजपही या मतदारसंघासाठी आग्रही होती. पण अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला  हा मतदारसंघ मिळाला असून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नरेश म्हस्के यांच्यासमोर ठाकरे गटाचे राजन विचारे यांचं आव्हान आहे. दरम्यान ठाणे मतदारसंघाचा आग्रह का सोडला याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी  केला आहे.

ठाणे मतदारसंघ न मिळाल्याने भाजपा समर्थक नाराज असल्याच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कोणत्याही पक्षाला आपल्याला जास्त जागा मिळाव्यात असं वाटणं साहजिक आहे. आम्हाला 30 जागांची अपेक्षा होती, पण 28 मिळाल्या. आम्ही ठाणे मिळण्यासाठी आग्रही होतो. पण मुख्यमंत्री म्हणाले की, ही जागा आम्ही सातवेळा जिंकली आहे. जर मी आनंद दिघेंचा मतदारसंघ जाऊ दिला तर माझ्या समर्थकांचं खच्चीकरण होईल. आम्ही ठाण्यासाठी आग्रह करु नये अशी त्यांनी विनंती केली”.