कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिका आयुक्त के. मंजू लक्ष्मी यांच्यासह अधिकाऱ्यांना डिसेंबर महिन्यात १०० कोटींची रस्त्यांची कामे टक्केवारीसाठी थांबली आहेत का, अशा शब्दांत खडसावले होते. तरीही अजून रस्त्यांचे काम सुरु झालेले नाही. या रस्ते कामाचा ठेका घेतलेल्या कंपनीचे कार्यालय अंधाऱ्या अवस्थेत आणि शिकाऊ मुलांकडून सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीला आंदोलनावेळी दिसून आल्याने आयुक्त के. मंजू लक्ष्मी व शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना घेराव घालण्याचा इशारा दिला आहे.
कोल्हापूर शहरांमध्ये रस्त्यांची दुरवस्था झाल्याची दखल घेऊन राज्य शासनाने १०० शंभर कोटी रुपये मंजूर केले आहेत. लोकप्रतिनिधी – अधिकारी यांच्यातील अर्थपूर्ण व्यवहारामुळे हे काम रखडले आहे. काम गतीने व्हावे यासाठी नागरिक कृती समितीने २ एप्रिल रोजी प्रतिकात्मक सोटा मारो आंदोलन केल्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले.
त्यांनी कृती समिती शहर अभियंता, ठेकेदार कंपनी, कन्सल्टींग कंपनी यांची संयुक्त बैठक घेऊन १ मे रोजी मंगळवार पेठेतील मुख्य रस्त्याचे काम पूर्ण करणार व १५ मे पूर्वी अगोदरच शहरातील इतर ५ रस्त्यांचे काम दर्जेदार पध्दतीने पूर्ण करण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. पण आज १३ मे उलटून गेला तरी काहीच कार्यवाही केलेली नाही. यावेळी ठेकेदार व्यवस्थापक सत्तार मुल्ला यांनी महापालिकेकडून सहकार्य मिळत नसल्याने हतबल झाल्याची खंत व्यक्त केली. आम्ही हातबल झालो आहोत.यात आमचा काही दोष नाही, असे मुल्ला यांनी सांगितले. त्यावर कृती समितीने २० मे रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आंदोलनात अशोक पोवार , रमेश मोरे , शामराव जोशी , गजानन यादव , प्रकाश चुयेकर , सदानंद सुर्वे, किशोरी यादव , प्रकाश आमते , चंद्रकांत चिले , वसंतराव मुळीक, प्रसाद बुलबुले , कादरभाई मलबारी , शंकरराव शेळके , महादेव पाटील , फिरोज खान , अमृत शिंदे, सुरेश कदम , राजाभाऊ मालेकर ,विलास मुळे , राजाराम कांबळे, प्रसाद जाधव आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.