आयपीएलच्या 59 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं.
गुजरातचा कॅप्टन शुबमन गिल आणि साई सुदर्शन या दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर गुजरातने चेन्नईसमोर 232 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 196 धावाच करता आल्या. गुजरातने या विजयासह चेन्नईकडून 26 मार्च रोजी झालेल्या पराभवाचा वचपा घेतला.
चेन्नईच्या पराभवामुळे दिल्ली कॅपिट्ल्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुलाही दिलासा मिळाला आहे. गुजरातचा हा या हंगामातील पाचवा विजय ठरला. गुजरातला या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये 2 स्थानांचा फायदा झाला. गुजरातने थेट 10 व्या स्थानावरुन 8 व्या स्थानी झेप घेतली. तर दुसऱ्या बाजूला चेन्नईला पराभवामुळे पॉइंट्स टेबलमध्ये तसा काही फरक पडलेला नाही. चेन्नईने चौथं स्थान कायम राखलंय. मात्र चेन्नईचं आता टेन्शन दुप्पटीने वाढलंय.
चेन्नईला आता प्लेऑफमध्ये पोहचायचं असेल, तर कोणत्याही परिस्थितीत उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. त्यातही चांगल्या आणि मोठ्या फरकाने विजय आवश्यक असणार आहे. त्यामुळे चेन्नईसाठी पुढील दोन्ही सामन्यांमध्ये ‘करो या मरो’ अशी स्थिती आहे. चेन्नईने 12 पैकी 6 सामने जिंकलेत. चेन्नईचा नेट रनरेट हा 0.49 असा आहे. तर चेन्नईचे पुढील 2 उर्वरित सामने हे राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध असणार आहेत. त्यामुळे चेन्नईला चांगलीच कंबर कसावी लागणार आहे.