मराठी वाहिनीवरील मालिकेत व्यक्तीरेखेसाठी पहिल्यांदाच AI चा  वापर

सध्या सगळीकडे चर्चेत आहे ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच  AI .  आता, छोट्या पडद्यावर मालिकेतील व्यक्तीरेखेसाठी AI चा वापर करण्यात येणार आहे. मालिकेतील एखाद्या व्यक्तीरेखेसाठी पहिल्यांदाच AI चा  वापर करण्यात येणार आहे. सोनी मराठी वाहिनीवर नुकतंच ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेचा प्रोमो आऊट करण्यात आला आहे. यामध्ये AI चा  वापर करण्यात येणार आहे. या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे हा बऱ्याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.  

अभिनेता सुबोध भावे याने आतापर्यंत  चित्रपटात, मालिकेत साकारलेल्या विविध  भूमिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सुबोध भावे टीव्ही मालिकेत पुनगरामन करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळे कोणत्या मालिकेतून सुबोध भावे छोट्या पडद्यावर येणार याची उत्सुकता होती. सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर प्रेक्षकांना याचे उत्तर मिळाले आहे. सुबोध भावे या ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेत प्रमुख भूमिकेत असून अभिनेत्री शिवानी सोनारसोबत त्याची जोडी दिसणार आहे. शिवानीने आजवर निरनिराळ्या भूमिका साकारल्या आहेत आणि ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता ती सोनी मराठी वाहिनीवरील  ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत झळकणार आहे. ‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका लवकरच सोनी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. .

‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत सुबोध भावे हा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. मात्र, या दोन्ही व्यक्तीरेखांमध्ये जवळपास 20-25 वर्षांचे अंतर असणार आहे. अभिमन्यू आणि माही अशी त्या व्यक्तिरेखांची नावे आहेत. ऐन चाळिशीतील अभिमन्यू सर कॉलेज प्रोफेसरच्या भूमिकेत दिसणार आहेत तर ऐन विशितला तरुण सुबोधही या मालिकेत दिसणार आहे. त्या व्यक्तिरेखेचं नाव माही आहे आणि AI च्या माध्यमातून हा तरुण सुबोध दाखविला जाणार आहे. अशा प्रकारे साकारलेली एक व्यक्तिरेखा टीव्ही मालिकेत पहिल्यांदाच सादर केली जाणार आहे.

‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेच्या प्रोमोमध्ये 25  वर्षांपूर्वीच्या कॉलेजमधल्या आठवणी जाग्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सुबोध भावे हा अतिशय तरुण दिसतो आहे. तो माही या तरुण मुलाच्या भूमिकेतही दिसणार आहे आणि एका शिक्षकाच्याही भूमिकेत आहे. AI चा वापर करून ह्या मालिकेतील व्यक्तिरेखा साकारली जाणार असल्याने  ‘तू भेटशी नव्याने’ ह्या मालिकेमुळे मालिका जगतात वेगळीच चर्चा निर्माण झाली आहे.