शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळालीच असती. पण केवळ त्यांचा मुलगा नाही म्हणून डावलले जात असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. या माध्यमातून अजित पवार यांनी त्यांच्या मनातील खदखद बाहेर काढली. शरद पवार आमचे दैवत आहे, यामध्ये कोणतेही दुमत नाही. मात्र, आता 80 वर्षांनंतर कुठेतरी थांबले पाहिजे. माझे वय देखील 60 च्या पुढे गेले आहे. आता किती दिवस थांबायचे? असा प्रश्नही अजित पवार यांनी विचारला आहे.
आता माझे वय देखील 60 पेक्षा जास्त झाले आहे. अजून किती दिवस थांबायचे? आम्हाला देखील संधी नको का? त्यामुळे भावनिक होऊ नका, पवार साहेब आमचे दैवत आहे, त्यामध्ये दुमत नाही. पण 80 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायला हवी. मी जर शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती की नाही? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. केवळ मी त्यांचा मुलगा नाही, त्यामुळे मला संधी नाही? हा कोणता न्याय? असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला.
शरद पवार यांच्याकडे जिल्हा बँक नव्हती. मी राजकारणात आल्यानंतर जिल्हा बँक ताब्यात घेतली. आणि आजपर्यंत जिल्हा बँक, जिल्हा परिषद आपल्या ताब्यात आहे. असा दावा अजित पवार यांनी केला आहे. बारामतीचा विकास कसा केला हे येऊन पहा. अनेक लोक आम्हाला निवडून द्या आम्ही बारामती सारखा विकास करू, असे आश्वासन देतात. यावरूनच आमच्या बारामतीचा विकासाचा प्रत्यय येतो, असे अजित पवार यांनी म्हंटले आहे.
आमच्या मतदारसंघांमध्ये आम्ही कारखाना चांगला चालवत आहोत. आमच्या कारखान्यातील शेतकऱ्यांना चांगला भाव देखील मिळत आहे. मात्र दुसरे कारखाने बंद पडण्याचे खापर माझ्या डोक्यावर फोडले जात आहे. तुम्हाला जर कारखाना चांगला चालवता येत नासेल तर त्याचे खापर माझ्यावर कश्याला फोडता ? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
अशोक पवार आणि अमोल कोल्हे हे दोघेही माझ्या शपथविधीला हजर असताना दिलीप वळसे पाटलांनी शपथ घेतल्यामुळे अशोक पवार यांची गाडी बिनसली. तो त्यांचा स्थानिक वाद आहे. मात्र ते आता माझ्या नावावर बोलत आहेत, असे देखील अजित पवार यांनी म्हंटले आहे. भाजप असो, शिवसेना असो, काँग्रेस असो की कोणत्याही पक्षाचा आमदार माझ्याकडे आला आणि त्याचे काम होत असेल तर मी ते नाही म्हणत नाही. मी प्रत्येक पक्षातील आमदारांचे काम करण्यासाठी प्रयत्न करतो. ही माझी पहिल्यापासून भूमिका आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना झुकते माप मिळते, याबद्दल दुमत नाही. मात्र याचा अर्थ विरोधकांची कामेच होत नाहीत, असे नाही. असे देखील अजित पवार यांनी म्हंटले आहे.
गिरीश बापट यांनी पुण्यासाठी चांगला निधी आणला होता. तसाच चांगला निधी आपल्याला येथे आणायचा आहे. विद्यमान खासदार वारंवार राजीनामा देत असल्याचे सांगत होते. मुंबईला त्यांचे शूटिंगचे असायचे. त्यामुळे त्यांना शिरुर मतदारसंघाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो. असे तेच सांगत होते. मात्र, त्यांना कसेबसे पाच वर्ष मी थांबायला लावले. आणि आता त्यांना पुन्हा उभे राहायचे आहे, असे देखील अजित पवार यांनी म्हंटले आहे.