मुंबई पदवीधरसाठी अनिल परब, वरुण सरदेसाईंना संधी मिळणार का ?

शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबई आणि कोकण पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीचे  उमेदवार लवकरच जाहीर होणार आहेत. मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब , वरून सरदेसाई  यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. तसेच, मुंबई शिक्षक मतदार संघात ज. मो. अभ्यंकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात किशोर जैन यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता दर्शिवली आहे . 

मुंबई पदवीधर मतदारसंघांमध्ये विलास पोतनीस हे आमदार म्हणून कार्यरत आहेत. मात्र आता त्यांच्याऐवजी विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांचे नाव मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार म्हणून सुचवले जाऊ शकते .

अनिल परब यांचा 27 जुलै रोजी विधान परिषदेच्या आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी अनिल परब यांचं नाव उमेदवारीसाठी अधिक चर्चेत आहे. त्यासोबतच ठाकरे गटाचे युवा नेते सचिव वरून सरदेसाई  यांचासुद्धा विचार मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी केला जात आहे. तर मुंबई शिक्षक मतदार संघासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांचं नाव उमेदवारीसाठी जवळपास निश्चित केले जात आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघातून रायगडचे सह संपर्कप्रमुख  आणि अनंत गीते यांचे विश्वासू किशोर जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर नाशिक शिक्षक मतदार संघात सध्या आमदार असलेले किशोर दराडे हे जरी  शिवसेना ठाकरे गटात सोबत असले तरी शिवसेना ठाकरे गटाकडून चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे .

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील चार जागांसाठी 10 जूनला मतदान होणार आहे.  विधान परिषद सदस्यांच्या एकूण सदस्यांपैकी 7 सदस्य शिक्षक, तर 7 सदस्य पदवीधर मतदार संघातून निवडून जातात. दरम्यान दोन पदवीधर आणि  दोन शिक्षक मतदार संघातील रिक्त होणाऱ्या एकूण चार जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार 10 जूनला मतदान होणार असून 13 जूनला मतमोजणी होईल.

🤙 9921334545