बारामतीसह महाराष्ट्रातील ११ तर देशभरातील ९४ मतदारसंघांमध्ये मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ११ जागांवरील प्रचाराची रविवारी सांगता झाली. यात सर्वांचं लक्ष होतं ते बारामती लोकसभा मतदारसंघावर. बारामतीमध्ये शरद पवार गट व अजित पवार गट अशा दोघांच्याही सांगता सभा पार पडल्या. यावेळी एकमेकांवर टीका-टिप्पणी पाहायला मिळाली. त्यात एकीकडे रोहित पवार भाषणात भावनिक झाल्यानंतर दुसरीकडे अजित पवारांनी भाषणादरम्यान त्यांची नक्कल केली.
बारामतीमधील प्रचारसभेत रोहित पवारांनी पक्ष फुटला तेव्हाचा प्रसंग सांगितला. “पक्ष फुटला तेव्हा मी आणि काही कार्यकर्ते-पदाधिकारी शरद पवारांसोबत बसलो होतो. ते टीव्हीकडे पाहात होते. ते सगळं झाल्यानंतर बाहेर जाण्यापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं की हा स्वाभिमानी महाराष्ट्र घडवण्यासाठी आपल्याला नवीन पिढी तयार करायची आहे. जोपर्यंत नवी पिढी ती जबाबदारी घेत नाही तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही”, असं रोहित पवार म्हणाले. यावेळी ते भावुक झाल्याचं दिसलं.
दुसरीकडे अजित पवार सुनेत्रा पवारांसाठी प्रचारसभा घेत होते. यावेळी अजित पवारांनी रोहित पवारांची नक्कल करत त्यांना टोला लगावला. “शेवटच्या सभेत भावनिक करण्याचा प्रयत्न करतील असं मी सांगितलं होतं. आमच्या एका पठ्ठ्याने डोळ्यांतून पाणी काढून दाखवलं. मीही दाखवतो. मलाही मतदान करा”, असं अजित पवार म्हणाले. यावेळी ‘मीही दाखवतो’ म्हणताना अजित पवारांनीही कार्यकर्त्यांना डोळा मारला, खिशातून रुमाल काढला आणि तो डोळ्यांना लावला.
दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवारांनी रोहित पवारांवर टीकाही केली. “ही नौटंकी बारामतीकर खपवून घेणार नाही. तुमचं खणखणीत नाणं दाखवा. हा रडीचा डाव झाला. साहेब नको म्हणाले असतानाही यांना जिल्हा परिषदेचं तिकीट मी दिलं. कर्जत-जामखेडला आम्ही मदत करू असं सांगून तिथूनही तिकीट दिलं. आम्ही तुम्हाला राजकारणाचं बाळकडू पाजलं आणि तुम्हीच आमच्यावर टीका करता? तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त पावसाळे-उन्हाळे आम्ही पाहिले आहेत”, असा टोला अजित पवारांनी लगावला.